Mula Dam : अहमदनगर जिल्ह्यात काल ( बुधवारी ) रात्री जोरदार पाऊस झाला. यात पारनेर तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाण्याची आवक वाढली. पाटबंधारे विभागाने मुळा धरणाचे दरवाजे उघडले आणि मुळा नदीत तब्बल 25000 क्युसेक वेगाने पाणी वाहू लागले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता प्रत्येकी दोन फूट उघडण्यात आले. यंदाच्या हंगामातील उच्चांकी 25 हजार क्युसेकने नदीपात्राद्वारे जायकवाडी धरणासाठी विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे, राहुरी तालुक्यात मुळा नदीला अचानक मोठा पूर आला. मुळा नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेले. काही गावांचा संपर्क तुटला.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल (बुधवारी) मध्यरात्री कोतुळ ते मुळा धरण दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील पाझर तलाव फुटल्याने त्याचे पाणी मांडओहोळ मध्यम प्रकल्पात आले. तेथून आज सकाळी सहा वाजता आठ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग मांडोळ नदीतून मांडवे (ता. पारनेर) येथे मुळा नदीच्या संगमात शिरला. लहित खुर्द (कोतुळ) येथून तीन हजार क्युसेकने वाहणाऱ्या पाण्यात मांडोळ नदीच्या पुराची भर पडली. शेरी-चिखलठाण, मांडवे, साकुर परिसरातील पावसाच्या पाण्याची चार हजार क्युसेकने आणखी भर घातली.
मुळा धरणात आज (गुरुवारी) सकाळी सहा वाजता 25,650 दशलक्ष घनफूट (98.65 टक्के) पाणीसाठा होता. पाणलोट क्षेत्रातील रात्रीच्या पावसाचे पाणी व शिंदेवाडी तलाव फुटल्याने वाढलेले पाणी प्रचंड वेगाने मुळा धरणात जमा होऊ लागले. धरणसाठा झपाट्याने वाढू लागल्याने, मुळा धरणावरील पूर नियंत्रण कक्षात नजर ठेवून असलेल्या मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता शरद कांबळे यांनी तात्काळ नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला.
मुळा धरणातून आज गुरुवारी (ता. 8) सकाळी सहा वाजता 2170 क्युसेकने नदीपात्राद्वारे जायकवाडी धरणासाठी विसर्ग सुरू होता. सकाळी सात वाजता पाच हजार; सकाळी आठ वाजता सात हजार; सकाळी नऊ वाजता दहा हजार; सकाळी दहा वाजता पंधरा हजार; दुपारी बारा वाजता वीस हजार; दुपारी दोन वाजता पंचवीस हजार क्युसेकने असा टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे, राहुरी तालुक्यातील कोंढवड व केंदळ बुद्रुक येथील मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेले.
"मुळा धरण परिचालन सूचीनुसार 25,650 दशलक्ष घनफूट धरणसाठा स्थिर ठेवून, नव्याने जमा होणार्या अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सोडला जात आहे. सध्या, 25 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. रात्री नऊ वाजता धरणसाठ्याचा आढावा घेतला जाईल. नंतर पाच ते दहा हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल."
- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.
जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग (क्यूसेकमध्ये)
प्रवरा नदी- भंडारदरा धरण 814, निळवंडे धरण 1134, ओझर बंधारा 2543
गोदावरी नदी- नांदूर मध्यमेश्वर बंधारा 17502, जायकवाडी धरण 9432
भीमा नदी- दौंड पूल 20184
घोड नदी - घोड धरण 23600
मुळा नदी - मुळा धरण 25000
धरणांतील पाणीसाठा (टक्केवारी)
भंडारदरा - 100
निळवंडे - 95.82
मुळा - 98.65
आढळा - 100
मांडओहोळ - 100
घोड - 97.69
सीना - 85.45
खैरी - 80.46
विसापूर - 100
मुसळवाडी - 100
टाकळीभान - 100
ओझर - 82.70
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.