Satara Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा व सांगलीचा जिल्हास्तरीय मेळावा विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाड (जि. सातारा) पार पडला. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा, सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जिल्हास्तरीय मेळावा कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात झाला.
या मेळाव्यासाठी पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी कानमंत्र देण्यात आला.
मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांच्यात पक्ष वाढीच्या प्रश्नावरुन आणि अन्य कारणावरुन आमदार जाधव यांच्यासमोरच हमरीतुमरी झाली. त्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.
शिवसेनेच्या सांगलीतील विद्यमान पदाधिकाऱ्याला राग अनावर झाल्याने त्याने माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. चक्क आमदार जाधव यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी संबंधितांची मनधरणी केली.
मेळाव्यात घडलेल्या प्रकाराला शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान या प्रकारानंतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. मात्र शिवसेनेच्या सांगलीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात झालेल्या राड्याचीच चर्चा जोरात सुरू आहे.
पक्ष काय कारवाई करणार ?
सांगलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत सर्व काही अलबेल नसल्याचे मेळाव्यातील वादावादी आणि हाणामारीवरून स्पष्ट होत आहे. पक्ष वाढीसाठी हे वातावरण योग्य नसल्याचे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सांगलीतील या वादावर प्रमुख नेते काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.