पंढरपूर : गेल्या 18 वर्षांमध्ये चुकीच्या पध्दतीने कारभार केला गेला. यामुळे आर्थिक दृष्टया अत्यंत सक्षम असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आता कर्जातून कारखाना बाहेर पडेल की नाही या विषयी साशंकता आहे. त्यामुळे गेल्या 45 वर्षापासून सुरु असलेला कारखाना केवळ चुकीच्या कारभारामुळे बंद पडला आहे. याला सर्वस्वी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष आमदार भारत भालके (Bharat Bhalke) व त्यांचे पुत्र संचालक भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करत, भगीरथ यांच्या चुकीमुळेच विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडेंचा (Samadhan Avtade) विजय झाल्याचा गौप्यस्फोट धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष व पंढरपूरचे उद्योगपती अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या थेट आरोपामुळे विठ्ठल परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.
पाटील यांनी दोन दिवसापूर्वी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना पंढरपूर तालुक्यातील राजकारण आणि सहकारी संस्था विषयी आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा दूधसंघाचा आवर्जून उल्लेख करत, भगीरथ भालके व आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर निशाना साधला. पाटील म्हणाले, कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबर पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभारलेला कारखाना त्यांच्या पश्चात त्यांचे शिष्य असलेले स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या काळात आर्थिक डबघाईला आला. 40 कोटींच्या ठेवी शिल्लक असलेल्या या कारखान्यावर आजघडीला सुमारे 600 ते 6,500 कोटींचे कर्ज आहे. या कर्जामुळे कारखाना बंद पडला आहे. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील 30 हजार ऊस उत्पादक सभासद आणि दीड हजार कामगारांचे हाल सुरु आहेत. या परिस्थितीला केवळ भालके कुटुंबिय जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
भगीरथ यांच्यावर टीका करताना त्यांनी आमदार प्रशांत परिचारकांनाही लक्ष केले आहे. चुलते (कै.) सुधाकर परिचारक यांनी पांडुरंग कारखान्याची उभारणी केली. त्यावर आमदार परिचारक हे राजकारण करत आहेत. केवळ एक साखर कारखाना चालवला म्हणजे विकास केला, असा त्याचा अर्थ होत नाही. जिल्हा दूध संघाची आजची परिस्थिती कोणामुळे झाली, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. आमदार समाधान आवताडे हे परिचारकांचे बाहुले बनले आहेत. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. परिचारकांच्या राजकारणामध्ये आमदार आवताडे झोकाळून गेले आहेत. केवळ भगीरथ भालकेंच्या चुकीमुळे भाजपचे समाधान आवताडेहे आमदार झाले आहेत, असे ही अभिजीत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टोलेबाजीमुळे पंढरपूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर आमदार परिचारक, आमदार आवताडे आणि भालके काय उत्तर देतात हे बघावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.