
कराड : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखली आहे. 21-0 असा विरोधकांचा धुव्वा उडाल्याने सत्तांतराचे स्वप्न अधुरे राहिले. पण यामागे जेवढे कष्ट बाळासाहेब पाटील यांचे होते तेवढचे कष्ट भाजपचेही होते असेच म्हणावे लागेल. भाजपमधील दोन नेत्यांच्या वादाचा फटकाच विरोधकांना बसल्याचे सांगितले जाते.
जवळपास 32 हजार सभासद असलेल्या सह्याद्री साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले. त्या दिवसापासून कारखाना जिंकून पाटील यांना दुसरा दणका देण्यासाठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या. यासाठी बाजार समिती पॅटर्न राबवून सर्व विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकायचा असे ठरवण्यात आले.
त्यासाठी आमदार मनोज घोरपडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ असे सगळे एकत्र आले होते. विरोधी गोटात चालेल्या या घडामोडींमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. सत्ताधारी आणि विरोधी गट अशीच दुरंगी लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठकाही सुरू होत्या. पण अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यात विसंवाद झाला आणि निवडणुकीत तिसरे पॅनेल पडले.
ज्याक्षणी तिसरे पॅनेल पडले, त्याक्षणी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. समर्थकांच्या व्हॉट्सअॅपला सह्याद्री जिंकल्याचे स्टेटस पडले. त्यानंतर विरोधातील दोन्ही पॅनेलमधील नेत्यांकडून आक्रमक प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. कारखान्यावरील कर्ज, विस्तारवाढीला झालेला विलंब, त्यावर वाढलेला खर्च अशा गोष्टींवर विरोधकांनी फोकस ठेवला. पण बाळासाहेब पाटलांनी याला संयमाने आणि मुद्देसूद मांडणी करत प्रत्युत्तर दिले.
खरंतर आजवर कराड उत्तर मतदारसंघात ज्यावेळी तिरंगी लढत झाली. तेव्हा त्याचा थेट फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाल्याचा इतिहास आहे. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत झाली आणि उत्तरेत परिवर्तन झाले. हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विरोधकांनी तिरंगी लढतीची चूक केली. त्याचाच फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाला, हे स्पष्ट आहे. त्याचवेळी ही तिरंगी लढत नक्की अंतर्गत वादामुळे घडली की कोणी घडवून आणली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.