Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची तब्बल आठ वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. त्याचवेळी त्यांनी आपण मोहोळ मतदारसंघातील जनतेशी बोलून राजकीय निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कदम हे येत्या २४ सप्टेंबर रोजी मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. कदम यांची मोहोळच्या राजकारणातील एन्ट्री कोणाला अडचणीत आणणार आणि कोणाला फायद्याची ठरणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. (Former MLA Ramesh Kadam on September 24 Mohol tour)
दरम्यान, माजी आमदार रमेश कदम हे २५ सप्टेंबरपासून मतदारसंघाचा गावभेट दौरा करणार आहेत. मतदारांशी संवाद साधून चर्चा करून त्यांची मते जाणून घेऊनच पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी रमेश कदम हे २०१४ पासून कारागृहात होते. तब्बल आठ वर्षांनी त्यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. मोहोळमधून २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना आमदार म्हणून केवळ दहा महिनेच काम करता आले होते. त्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघात मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता हा अभिनव उपक्रम राबविला होता. तो मतदारसंघातील नागरिकांना भावला होता. त्यांनी मतदारसंघात सुमारे ३७० विंधनविहिरी घेतल्या होत्या. त्या अद्यापही सुरू आहेत.
आमदार कदम यांनी कारागृहात असताना २०१९ ची विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी दहा महिन्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची नागरिकांनी त्यांना पोहोच देत कुठलाही प्रचार न करता त्यांना २५ हजार मते मिळाली होती. सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर जो हा विश्वास दाखवला आहे, त्यांचे आभार मानण्यासाठी, तसेच त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आठ वर्षांनी राजकीय परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, आपण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अंतिम निर्णय हा मतदारांना विचारूनच घेणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सध्या मतदारसंघात पाणीटंचाई आहे, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता हा उपक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, २४ सप्टेंबरला ग्रामदैवत नागनाथ महाराज, महबूब सुभानी दर्गा, शक्तिदेवी व बुद्ध विहाराचे दर्शन घेणार आहेत. नगर परिषदेसमोर स्वागत सभा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.