Nagar: संगमनेर कारागृहात पहाटे सराईत गुन्हेगार आरती म्हणत होते. कारागृहात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. यातच डाव साधला आणि सराईत चौघा गुन्हेगारांनी पळ काढला. संगमनेर शहर पोलिस ठाणे लगत असलेल्या कारागृहात हा प्रकार झाला. राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल कांबळे या चौघा सराईत गुन्हेगारांनी कारागृहाचे गज कापून बुधवारी पहाटे पलायन केले आहे. सराईत गुन्हेगार पळाल्याने कारागृह पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
कारागृहातून सराईत गुन्हेगार पळून गेल्याची माहिती समजताच कारागृह पोलिसांची शोधाशोध सुरू झाली. कारागृहातून पलायन केलेले कैदी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. नाशिक, नगर, पुणे येथे पथके रवाना झाली आहेत. सराईत गुन्हेगार पळाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कारागृहातून पलायन केलेले चौघे गुन्हेगार हे सराईत आहे. रोशन थापा ददेल आणि अनिल ढोले याच्याविरोधात बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद आहे. राहुल काळे याच्याविरोधात खुनाच्या गुन्ह्याची, तर मच्छिंद्र जाधव याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.
कारागृह पोलिसांनी मंगळवारी रात्री कैद्यांची मोजदाद केली होती. त्यावेळी कारागृह असलेल्या कैद्यांची संख्या योग्य भरली. यानंतर कारागृहातील पोलिस गाफील राहिले. यानंतर पहाटे कारागृहातील कैद्यांनी आरती सुरू केली. कैदी असा प्रकार करत असतात म्हणून, बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
कैद्यांनी आरतीचा आवाज वाढवला आणि यातच कारागृहाचे गज कापले गेले. पोलिसांना काही समजण्याच्या आतच या चौघांनी तेथून धूम ठोकली. कैद्यांनी बाहेर पडल्यानंतर अचानक आरती थांबली. यानंतर पोलिसांनी कारागृहातील खोल्यांमध्ये डोकावून पाहिले. यानंतर सराईत गुन्हेगार पसार झाल्याची समोर आले आणि पोलिसांचा एकच गोंधळ उडाला.
संगमनेरमधील हे कारागृह शहर पोलिस ठाण्यालगत आहे. या कारागृहात संगमनेर शहर, तालुका, घारगाव, कोपरगाव आणि शिर्डी परिसरातील कैदी ठेवले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी या कारागृहात ठेवले गेले होते. कैद्यांच्या तुलनेत पोलिस बंदोबस्त कमी आहे. कारागृहात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कैद्यांनी शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकारदेखील केल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.