राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) : भाजपचे ( BJP ) माजी मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अण्णा हजारे यांच्या बरोबर दहा मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेचा तपशिल मात्र समजू शकला नाही.
गिरीश महाजन म्हणाले, राज्यातील सरकारने राज्याला गेल्या दोन वर्षात किती तरी मागे नेऊन ठेवलं आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची कामे सुरू नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले आहेत, असा गंभीर आरोप गिरीष महाजन यांनी राज्य सरकारवर केला.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांवर सध्या मोठ्या चौकश्या सुरू आहेत. भ्रष्टाचाराला तर कोणतीच मर्यादा शिल्लक राहिली नाही. राज्यात अगदी सनदी अधिकाऱ्यांपासून तर थेट खालच्या शिपायांपर्यंतचा सर्वच जण सांगत आहे की राज्यात असा कधी भ्रष्टाचार पाहिला नव्हता किंवा होईल असा कधी विचार केला नव्हता. राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा चौकशी नाही. हा तर सरकारचा निर्लज्जपणाचा कळस आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिन्याभरापासून सरकारला मिटवता येत नाही. हे सरकारचे अपयश आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाज आंदोलन, ओबीसी आरक्षण मुद्दा, नाशिक येथून निघालेला लाल बावट्याचा मोर्चा, प्रतिभा शिंदे यांचे आंदोलन असे विविध मोर्चे, आंदोलन राज्य सरकार विरोधात झाले मात्र सरकार म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांना आंदोलन स्थळी जाऊन भेटत होतो. मी स्वतः या घटनांचा साक्षीदार आहे. मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचो. त्यावेळी सर्वपक्षीय चर्चा व्हायची. मात्र या सरकारला आंदोलनाचे काही घेणं देणं नाही. आंदोलन, उपोषण, मोर्चा काढा मात्र यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांनी अथवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना भेटणं गरजेचे होतं मात्र तसे झाले नसल्याने सध्या राज्यातील जनतेचे हाल होत आहेत आणि आंदोलनही चिघळल आहे, असेही महाजन यांनी सांगितले.
महाजन म्हणाले, राज्यातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये बसावं लागलं आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले सनदी अधिकारी कुठे आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे मात्र या तिघांचा एकमेकांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत मात्र कुणावरही कोणतीच कारवाई अथवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत नाही. 1995 साली आमचे सरकार सत्तेवर असताना मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामे दिले होते. मात्र या सरकारमध्ये असे काहीही दिसत नाही.
राज्यात हे सरकार पाच वर्ष टिकेल की नाही हे माहीत नाही मात्र राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे राज्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्याची जवळपास 10 वर्षांनी अधोगती झाली आहे. राज्यात सध्या कोणत्याही प्रकारची नविन कामे सुरू नाहीत. जुन्या कामांवरूनच भांडण सुरू आहेत. कोणत्या कामाला कोणाचं नाव द्यायचे, ह्याचं द्यायचं की त्यांच्या वडिलांचे असंच सुरू आहे. कोणत्या कामात किती कमिशन घ्यायचे, बदल्यांमध्ये पैसे खायचे एवढंच सुरू आहे. त्यामुळे हे सरकार किती वर्षे टिकेल यापेक्षाही राज्याचे होणारे नुकसान खूप मोठे आहे, अशी टीका ही महाजन यांनी केली.
यावेळी सरपंच लाभेष औटी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, दादा पठारे, उद्योजक सुरेश पठारे, जेष्ठ पत्रकार मार्तंड बुचुडे, संदीप पठारे, श्याम पठाडे, नाना आवारी, अन्सार शेख आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.