
Kolhapur Politics : गोकुळ दूध संघातील ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा न देता अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी आवाहन करूनही डोंगळे राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आताही त्यांनी सांगितले तरच आपण राजीनामा देऊ अशी भूमिका डोंगळे यांनी घेतली आहे.
डोंगळे यांच्या या भूमिकेमुळे गोकुळ दूध संघ राज्यभरात चर्चेला आला आहे. पण ज्या मुश्रीफ आणि पाटील यांच्या आशीर्वादाने ते गोकुळचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले तेच आता मुश्रीफ यांच्याच विरोधात का जात आहेत? शिवाय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ते एवढे जवळ का गेले? त्यांनी नेमकी अशी का भूमिका घेतली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण पडद्या मागच्या घडामोडी पाहता दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे बोलले जाते.
खरंतर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे ही दोन प्रमुख आणि मातब्बर नावे आहेत. सर्वाधिक ठराव धारक असल्याने या दोन प्रमुख चेहऱ्यांना गोकुळच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. ज्या नेत्यांकडे हे दोघे त्याच नेत्यांकडे गोकुळच्या सत्तेच्या चाव्या असे जणू समीकरण अलीकडच्या काळात बनले आहे. महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील तसेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांनीही याचा अनुभव घेतला आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे 25 वर्षे गोकुळच्या सत्ता होती. याकाळात अनेक वर्षे विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे महाडिक आणि पी.एन. पाटील यांच्यासोबत होते. मात्र अध्यक्षपदावरून विश्वास पाटील यांचे तर विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांचे महाडिक यांच्याशी बिनसले. याचाच फायदा घेत संघाच्या 4 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांनी सोबत घेतले.
डोंगळे आणि विश्वास पाटील सोबत येताच सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या जोडीने महाडिक आणि पीएन पाटील यांची सत्ता उलथवून टाकली. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सतेज पाटील गटाकडे गोकुळच्या पहिल्या दोन वर्षाचे अध्यक्ष पद राहिले. त्यावेळी विश्वास पाटील यांना संधी देण्यात आली. तर उर्वरित दोन वर्षे हसन मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद निवडण्याची संधी आली. त्यावेळी अरुण डोंगळे यांना अध्यक्ष पद देण्यात आले. डोंगळे हे हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय बनले.
पण अडीच वर्षांनी राज्यात महायुतीचे सरकार आले आणि तिथून डोंगळे यांचे सूर बदलले. आता देखील विधानसभा निवडणुकीत डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेतला. आमदार चंद्रदीप नरके, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारात ते अग्रेसर राहिले. त्यातूनच त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली. महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर भर स्टेजवर डोंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आता 25 मे रोजी डोंगळे यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपत असल्याने डोंगळे यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. गोकुळच्या अध्यक्षपदावर पुन्हा विश्वास पाटील किंवा बाबासो चौगुले यांचे नाव आघाडीवर राहिले. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पुढील वर्षी गोकुळची निवडणूक लक्षात घेता गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असावा अशी जिल्ह्यातील महायुती नेत्यांची इच्छा आहे. त्यातूनच डोंगळे यांना राजीनामा देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. गोकुळसाठीही सरकारची मदत महत्वाची आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
दुसरीकडे गोकुळच्या बाबासो चौगुले यांच्याकडे अध्यक्षपद देण्यास सत्ताधारी गटातीलच काही संचालक आणि मोठ्या नेत्यांचा विरोध आहे. गोकुळमधील अध्यक्षपदाचा तिसरा पर्याय निर्माण होत असल्याचे पाहुन हे संचालक आणि नेते अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते. प्रस्थापित नेत्यांना तिसरा पर्याय डोकेदुखी ठरू शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत आपले अस्तित्व धोक्यातील अशी भीती काही संचालकांच्या मनात आहे. डोंगळे यांनाही हीच भीती सतावत असावी.
अशातच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची मैत्री पाहता याबाबत मुश्रीफ यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असावी. त्यामुळे याच हेतूने त्यांनी थेट मुंबई गाठली आणि तिथूनच महायुतीचा अध्यक्ष करण्यावर भर दिला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. शिवाय डोंगळे हे कोणत्याही क्षणी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गोकुळच्या राजकारणावर आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीची पकड असावी यासाठी जिल्ह्यातील नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.