Kolhapur News, 19 Jul : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी असला तरी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. महाडिक गट आतापासूनच रणनीती आखताना दिसत आहे.
गोकुळ दूध संघामधील 21 संचालकावरून हा आकडा 25 करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळ अग्रेसर आहे. पण त्याला आव्हान देण्यासाठी महाडिक गट सक्रिय झाला आहे. वाढणाऱ्या संचालकांचा बोजा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार असल्याचे सांगत त्याला माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीपर्यंत आवाज उठवण्याची तयारी केली आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाष्य केल्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्यावर जाऊन महाडिक यांची भेट घेतली. गोकुळच्या वाढत्या संचालकांच्यावर सुरू असलेल्या राजकारणासाठी थेट दिल्लीपर्यंत शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
'गोकुळ'ची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी होत आहे. जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांकडून गोकुळ मधील ठराव घेण्यासाठी आर्थिक टोकन दिल्याच्या घटनाही ताज्या आहेत. ठराव धारक आपल्याकडे खेचण्यासाठी चुकीचा पायंडा पाडला जात आहे अशी काही नेत्यांची भूमिका आहे. त्यालाच अनुसरून गोकुळ दूध संघामध्ये संचालक वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मात्र, या निर्णयाला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या सोबतच ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कडाडून विरोध करत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली आहे. संचालक वाढवून काय फायदा होणार आहे, उलट खर्च वाढणार असल्याचे सांगून माजी आमदार महाडिक यांनी गोकुळचा राजकारण ढवळून काढले आहे.
दरम्यान, येत्या दोन महिन्यात गोकुळची सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न होणार आहे. वार्षिक सभेत या नियमाला विरोध करण्याची रणनीती यांच्या ताब्यात असलेला छत्रपती राजाराम कारखान्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात ठरली आहे. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत संचालक वाढीचा निर्णय पुढे येणार आहे.
त्याला विरोध कसा करायचा? दूध संस्था वाढल्या पण दूध का वाढले नाही? कर्नाटकातून किती दूध येते, अनेक संस्थांचे नुकसान होत आहे ते कसे रोखायचे, सभासदांच्या हितासाठी काय निर्णय घ्यायचे याबाबतची सखोल चर्चा काका-पुतण्यात झाली. संचालक वाढीच्या निर्णयाला विरोध करून पुन्हा एकदा गोकुळच्या राजकरणात आपले अस्तित्व कसे निर्माण करायचे, यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरून राजकीय वजन कसे वापरायचे यावर चर्चा झाली.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत आवश्यकता वाटल्यास सभासदांच्या हितासाठी त्यांच्याकडूनही सहकार्य घेण्यापर्यंत चर्चा झाली. खासदार महाडिक यांनी याला दुजोरा दिला. आवश्यकता वाटेल तेव्हा सर्वांसमोर गोकुळच्या हितासाठी संघातील कारभारावर सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘दूध उत्पादक आणि गोकुळचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालकवाढीचा निर्णय होत असेल, तर त्याला माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विरोध आहे. त्याला माझे समर्थन आहे. दूध उत्पादकांचे आणि गोकुळचे हित होत असेल, तर त्याला आमचे समर्थन असेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.