

Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यावर आज खासदार धनंजय महाडिक यांनी मोठे भाष्य केले. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलीच आहे. पण सध्या बिनविरोधाचा प्रस्ताव कोणालाही देणार नाही. महायुतीमधील चारही घटक पक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तसा कोणताही प्रस्ताव देण्याची आवश्यकता आम्हाला नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं, ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. ठरावधारकांच्या पात्रतेवरून निर्माण झालेला वाद न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या भेटीगाठींवरून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
गोकुळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने निवडणूक लढतील. जिल्ह्यातील संस्थाचालक आणि ठरावधारकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महायुतीच्या बाजूने वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला.
महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या जात असल्याचा उल्लेख करत महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावरही टीका केली. मागील गोकुळ निवडणुकीच्या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेतील सर्व नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्यात आली होती. आता समविचारी आघाडीची गरज का भासत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोकुळच्या निवडणुकीत पात्र असलेल्या प्रत्येक संस्थेला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमच्या संपर्कातील काही संस्थांविरोधातही तक्रारी झाल्या आहेत. त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या कारभाराचा संदर्भ देत त्यांनी माजी मंत्री महादेवराव महाडिक यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. संस्थाचालकांना त्या काळातील कारभाराची आठवण असून गोकुळमध्ये पुन्हा त्याच पद्धतीचा कारभार यावा, असा कल ठरावधारकांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला.
गोकुळची निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलेच आहे, मात्र त्यासाठी महायुतीकडून कोणाला प्रस्ताव देण्याची आवश्यकता नाही, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. महायुतीतील घटक पक्षांची संख्या आणि पाठिंबा मोठा असल्याने निवडणूक झाली तरी महायुती सक्षमपणे सामोरे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होत असला तरी हा महामार्ग झाला पाहिजे, अशी भूमिका महाडिक यांनी मांडली. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याबरोबरच उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळू शकते. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जातील. समन्वयातून मार्ग काढून महामार्ग पूर्ण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
करवीर तालुक्यातील १४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा संदर्भ देत, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले. विरोध असला तरी कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, धनंजय महाडिक युवा शक्तीतर्फे यंदा १८व्या वर्षी गोकुळाष्टमी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ सप्टेंबरला दसरा चौकात हा सोहळा होणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ५, ६ आणि ७ थरांसाठीही अनुक्रमे ५ हजार, ६ हजार आणि १५ हजार रुपयांची सलामी देण्यात येणार आहे.
यंदा आठ थर रचणाऱ्या गोविंदा पथकासाठी स्वतंत्र एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून वरच्या गोविंदाला हार्नेससह सुरक्षा साधने दिली जाणार आहेत. दहीहंडी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाडिक यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.