Kolhapur News, 26 Feb : नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे मिळालेली स्थगिती उठवलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा मानला जाणारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी तालुका निहाय संस्थेची यादी मार्च महिन्यापूर्वी विभागाकडे सादर करण्याचे आदेश गोकुळ दूध संघाला दिले आहेत. यासाठीची ठराव संकलन प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होणार आहे. मागील निवडणूक २ मे २०२१ रोजी झाली होती. पाच वर्षांनंतर विद्यमान संचालकांची मुदत ४ मे २०२६ रोजी संपणार आहे.
विद्यमान संचालकांची मुदत संपण्याची तारीखच अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. तत्पूर्वी तीन वर्षे अगोदर ‘गोकुळ’च्या सभासद झालेल्या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ४ मे २०२३ पूर्वी सभासद झालेल्या संस्थांची यादी दोन मार्च रोजी सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’ला दिले आहेत.
तालुका निहाय संस्थांचे ठराव सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयात सादर करावे लागणार आहेत. त्यासाठी नऊ मार्चपासून संस्थांना ठराव सादर करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पंधरा दिवसांचा कालावधी असेल. या हरकतींवरील सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी निश्चित केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर एक महिन्यात ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.
दरम्यान 2023 ची सभासद नोंदणी ही मतदानासाठी पात्र असणार आहे. मागील निवडणुकीत 3656 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा 5450 सभासद या निवडणुकीस पात्र असणार आहेत. पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी 1854 सभासदांची नोंदणी केली आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी गटाने नव्या सभासदांच्या नोंदणीचा धडाकाच सुरू केला होता.
तब्बल 1854 इतके वाढलेले सभासद असून ते कुणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीचा काळ ठरवणार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 868 सभासद संस्था करवीरमध्ये आहेत तर सर्वात कमी 132 गगनबावडा तालुक्यात आहेत. राधानगरी 703, आजरा 308, भुदरगड 598, चंदगड 426, गडहिंग्लज 402 ), हातकणंगले -167, कागल 622, पन्हाळा 519, शाहूवाडी 452, शिरोळ 274 इतकी पात्र सभासदांची संख्या तालुकास्तरावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.