

Solapur, 09 April : लोकसभेची २०२९ ची निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पक्षाकडून अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. आगामी काळात राबविण्यात येणारे प्रशिक्षण वर्ग, एसआयआर अभियान, आंबेडकर जयंती, ता. २६ एप्रिलच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी पक्षाकडून प्रभारी नेमण्यात आले आहेत. त्यात सोलापूर पूर्व आणि सोलापूर पश्चिम (माढा लोकसभा) विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भारतीय जतना पक्षाने (BJP) पक्ष मजबुतीकरणाचे काम हाती घेतली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपेक्षा भाजपचे लक्ष हे आगामी लोकसभा निवडणूक असणार आहे, त्या दृष्टीनेच भाजपने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
आगामी तीन वर्षांत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजपकडून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये पंडीत दिनदयाळ प्रशिक्षण महाअभियान जिल्हा प्रशिक्षण वर्ग, एसआयआर अभियान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, ता. २६ एप्रिल रोजी होणारी मन की बात या कार्यक्रमासाठी भाजपकडून प्रभारी नेमण्यात आले आहेत.
आजी माजी आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे या अभियानांची जबाबदारी असणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी भारतीय जनता पक्षाने दोन प्रभारी नेमले आहेत. सोलापूर शहराची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे दिली आहे.
आमदार पडळकर यांच्याकडे सोलापूर पूर्व (सोलापूर लोकसभा) आणि सोलापूर पश्चिम (माढा लोकसभा) अशा दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात संघटना बांधणीच्या दृष्टीने भाजपने तयारी चालविल्याचे दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे दिली आहे. पुणे शहर हे शेखर इनामदार, पुणे उत्तर मावळ आणि सातारा वर्षा डहाळे, पुणे दक्षिण (बारामती) सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड हे माजी आमदार संजय जगताप यांच्याकडे असणार आहे.
कोल्हापूर शहर, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) आणि कोल्हापूर पश्चिम (करवीर) विभागाची जबाबदारी विक्रम पावसकर यांच्याकडे असणार आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर ग्रामीणची जबाबदारी असणार आहे.
सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे प्रथमच भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तसेच, सांगली जिल्हा परिषदेतही भाजपने पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय यश मिळविले आहे, आता पडळकर सोलापूर जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.