सांगली : काँग्रेसचे (Congress) सांगलीतील (sangli) नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) हे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू होती. मात्र, खुद्द विश्वजित कदम यांनीच याबाबत भाष्य केले आहे. मी भाजपमध्ये जाणार, भाजप नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे, अशा अफवा पसरविण्यात सांगलीपासून मुंबईपर्यंतच्या (Mumbai) अनेक लोकांचा हात आहे, असा आरोप कदम यांनी केला आहे. (Hand of many people from Sangli to Mumbai behind my BJP entry talk : Vishwajit Kadam)
माजी मंत्री कदम हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्यात रंगली होती. मात्र, त्यावेळीही कदम यांनी त्याचा इन्कार केला होता. त्यासंदर्भात कदम यांनी आता सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. मी भाजपमध्ये जाणार आहे. नेत्यांशी चर्चा सुरू आहे, अशा अफवा माझ्याबाबत पसरविण्यात आल्या. त्या चर्चांमागे सांगलीपासून मुंबईतच्या अनेक लोकांचा हात आहे. त्याबाबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘तुम्हीच चौकशी करा,’ असे मी सांगितले होते. ती चर्चा आणि अफवा आता माझ्यासाठी संपल्या आहेत, असे सांगून कदम यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि राहील, हे आगामी निवडणुकांत दाखवून देण्यात येईल. त्यासाठी सांगलीत काँग्रेस अधिक जोमाने कामाला लागेल. सांगलीत काँग्रेस एकजीव आहे. मागील दोन-अडीच वर्षे कोरोनात गेली, त्यामुळे पक्षवाढीच्या संदर्भात तेवढ्या जोमाने काम करता आले नाही. त्या परिस्थितीतही लोकांना एकत्र करत तिरंगा यात्रा काढली. सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत पक्ष कमजोर आहे, हे मान्य पण त्यामध्ये आगामी काळात नक्की सुधारणा होईल, असेही विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीला इशारा
सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिले होते. त्याबाबत कदम यांनी भाष्य केले आहे. स्वतःच्याच पक्षाचे नगरसेवक का येत नाहीत, याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने करावे. नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन आगामी काळात राष्ट्रवादीबाबत कठोर निर्णय घेऊ, असा इशाराही कदम यांनी मित्रपक्षाला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.