जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध संघातील (Dudh Sangh) चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता. १४ ऑक्टोबर) पहाटे तीन वाजता सुरक्षा काढून शिंदे-फडणवीस सरकारने खडसेंना दणका दिल्याची चर्चा आहे. (Eknath Khadse's Y grade security withdrawn)
जळगाव जिल्हा दूध संघातून ७०० कोटी रुपयांच्या बटरची, तर २६५ कोटी रुपयांच्या दूध भुकटीची चोरी झाली आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी खडसे यांनी पोलिस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या मांडला होता. त्याच गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री तीन वाजता शिंदे-फडणवीस सरकारने खडसे यांची वाय दर्जाची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला.
याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, मी जेव्हा पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलो, त्यावेळी मला संरक्षणासाठी देण्यात आलेले पोलिसही माझ्याबरोबर होते. मात्र, मध्यरात्री तीनच्या सुमारास वायरलेस गाडी आली आणि माझं पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसांनी सांगितले की आम्ही सकाळी येतो, त्यावेळी त्यांना तातडीने माझे संरक्षण काढल्याचे सांगून बोलावले. काढलं तर चांगली गोष्ट आहे, मी पोलिस संरक्षण मागितलेच नव्हते. धमकी आल्यामुळे सरकारनेच मला ते संरक्षण दिले होते. अजूनही मला धोका आहे.
माझं पोलिस संरक्षण काढले, यात काही विशेष नाही. तुम्ही दिलं, तुम्ही काढलं. पण पन्नास खोके ज्यांनी घेतले आहेत, त्यांचं काय. त्यांचं पोलिस संरक्षण तुम्ही केव्हा काढणार आहात. आमच्यासारख्याचं पोलिस संरक्षण काढण्यासाठी सरकारने एवढी तत्परता दाखवली. कारण सरकारच्या विरोधात आंदोलन केलं की त्या माणसाला त्रास दिला पाहिजे, नाउमेद केले पाहिजे, अशीच भूमिका सरकारची राहिलेली आहे. सरकारमधील मंत्री-संत्री हे यामागचे पाठीराखे आहेत. आमच्याप्रमाणेच ज्यांनी पन्नास खोके घेतले, त्यांचेही संरक्षण तातडीने काढून घ्यावं, असे आव्हान खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
विधानसभेत मी अंडरवर्ल्डच्या संदर्भात भूमिका मांडत हेातो. त्यावेळी मला पाकिस्तान, सौदी अरेबिया व अन्य देशातून मला जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यासंदर्भात पत्रही आलं होतं. पोलिसांनी ते जप्त केले होते. त्या धमकीप्रकरणी पोलिस चौकशीही करण्यात आली हेाती. चौकशी करूनच पोलिसांनी मला स्वतःहून संरक्षण दिले हेाते. मी मागितलंही नव्हतं. त्यामुळे काढून घेतल्याचं मला वाईटही वाटत नाही आणि दुःखही हेात नाही. मला गरज नसेल आणि सरकार माझ्या जिवाची जबाबदारी घेत असेल तर मला संरक्षणाची गरजच काय, असा सवालही खडसे यांनी या वेळी बोलताना केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विनंतीनुसार खडसे यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र, जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.