Haryana Election 2024 : हरियाणामध्ये 90 जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर हरियाणात भाजपमध्ये मोठे खिंडार पडत आहे. पक्ष नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. तब्बल 22 विधानसभा जागांवर भाजप समर्थक आणि अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. काल 5 नेत्यांनी राजीनामे दिले होते तर आज 14 नेत्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री रणजित सिंह चौटाला, आमदार लक्ष्मण दास, किसान मोर्चाचे अध्यक्ष सुखविंदर शेओरान, प्रदेश उपाध्यक्ष जीएल शर्मा आणि पीपीपीचे राज्य समन्वयक सतीश खोला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे मंत्री विश्वंभर वाल्मिकी, माजी मंत्री कविता जैन, सावित्री जिंदाल, लतिका शर्मा यांच्या पदाधिकार्यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहेत.
राज्याचे ऊर्जा मंत्री रणजित चौटाला यांनी समर्थकांची बैठक बोलावली. आपल्या समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले की भाजपने त्यांना डबवालीतून तिकीट दिले होते परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. त्यांनी मंत्रिमंडळाचा आणि भाजपच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कोणत्याही किंमतीत रानियातूनच निवडणूक लढवणार आहे असा निश्चय केला आहे.तर सोनीपत मधून तिकीट कापलेल्या माजी मंत्री कविता जैन गुरुवारी आपल्या समर्थकांसमोर ढसाढसा रडल्या. पक्षाला 9 सप्टेंबरपर्यंतची मुदत देत त्यांनी सोनीपत मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार निखिल मदान यांना तीन दिवसांत बदलण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांना हिसारमधून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्याकडे जाऊन नाराजी व्यक्त केली. देशातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महिला आणि दोन वेळा मंत्री राहिलेल्या सावित्री जिंदाल यांनी सांगितले की, ती हिसार विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Election) निवडणूक लढवणार आहे, मात्र त्या कोणत्याही पक्षात सामील होणार की अपक्ष याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
दरम्यान, आता भाजपने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी बिप्लब कुमार देब यांनी रोहतक येथील पक्षाच्या राज्य मुख्यालयात बैठक घेऊन नाराज नेत्यांची समजूत घालून बंडखोरी थांबवण्याची जबाबदारी तीन सरचिटणीसांवर सोपवली असल्याची माहितीही समोर आली आहे.
भाजपमधील नाराजी नाट्य पाहून काँग्रेस (Congress) सावध झाली आहे. सध्या काँग्रेसने उमेदवारांची यादी पुढे ढकलली आहे. भाजपच्या असंतुष्ट आणि बंडखोर नेत्यांना खिंडीत पकडण्याची काँग्रेस तयारी करत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा पक्षाला घ्यायचा आहे. त्यामुळेच आज दीपेंद्र हुडा आणि कुमारी सेलजा आणि इतर नेत्यांनी उमेदवारांच्या यादीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.