

फलटण ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात हॉटेलचे मालक आणि माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले यांनी घटनाक्रम स्पष्ट केला, त्यांनी सांगितले की डॉक्टर रात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये आल्या आणि सर्व नियमांनुसार त्यांना रूम दिली गेली.
भोसले यांनी स्पष्ट केलं की महिला डॉक्टरने रूम घेतल्यानंतर कुणालाही आत प्रवेश दिला गेला नाही आणि सकाळी प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत, त्यांच्या आरोपांना बालीश आणि निराधार म्हटलं, तसेच राजकीय हेतूने प्रकरण रंगवलं जात असल्याचा आरोप केला.
Phaltan, 03 November : फलटण ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरने ज्या हॉटेलमध्ये भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केली. त्या हॉटेलचे मालक तथा फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले यांनी संबंधित महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्यापासूनचा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. तो सांगताना दिलीप भोसले यांंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीकास्त्र सोडले आहे.
माजी नगराध्यक्ष भोसले म्हणाले, फलटण शहराला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खूप दिवस गप्प बसल्यानंतर जनतेपुढे वस्तुस्थिती नेली पाहिजे, म्हणून पत्रकार परिषद घेतली. पोलिस तपासात अडचणी येऊ नयेत; म्हणून पत्रकारांनी विनंती करूनसुद्धा आम्ही ती क्लिप दिली नाही. ती महिला डॉक्टर रात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये आली. ‘मी बारामतीला जाणार आहे, पण आता उशीर झाला आहे, त्यामुळे आजच्या दिवस इथं रूम मिळाली तर बरं होईल,’ असे त्यांनी सांगितले. त्या मॅडमला वॉचमननी प्रवेश दिला, त्यांची स्कूटरही आतमध्ये लावली.
वॉचमन ‘त्या’ महिलेला घेऊन रिस्पशनेला गेला. रितसर कागदपत्रं घेऊन त्यांच्या हस्ताक्षरात त्यांची एन्ट्री घेण्यात आली. नियमाप्रमाणे सर्व पूर्तता करून त्यांना रुमची चावी देण्यात आली. रात्री एक ते दीडला येणाऱ्या महिलेला रुम दिली पाहिजे. न देणं हा कायद्याने गुन्हा आहे. समजा त्या रात्री त्या महिलेला रूम दिली नसती आणि ती तशीच बाहेर गेली असती आणि तिच्यावर काही वाईट प्रसंग ओढावला असता तर तिने दुसऱ्या दिवशी रूम न दिल्याचा आरोप केला असता, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.
भोसले म्हणाले, हॉटेलची रूम दिल्यानंतर त्या स्वतः चावी घेऊन गेल्या. रूम उघडताना त्या अस्वस्थ दिसत होत्या, हे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. रात्री दीड ते पावणेदोनच्या सुमारास त्या ज्या रुममध्ये गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास चहा, पाण्यासाठी नॉक करण्यात आले. पण, प्रतिसाद मिळाला नाही. साडेअकराच्या सुमारास दुसरा मॅनेजर आला, त्यानेही नॉक केले. पण प्रतिसाद मिळालेला नाही. त्या रात्री उशिरा आलेल्या असल्याने झोपल्या असतील, असे समजून तो मॅनेजर सुटीवर गेला.
दुसऱ्या मॅनेजरला त्यांनं सांगितलं, ‘त्या महिलने पैसे दिलेले नाहीत. त्या थकलेल्या असतील, त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका.’ आम्ही बाहेरगावी होतो, त्यावेळी आमच्या धाकट्या मुलाला मॅनेजरचा फोन आला. अशी अशी घटना घडली असून आतून प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून सांगण्यात आले. आमच्याकडे २४ तासाचा चेकआऊट आहे. पण तो बाराला असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहा-सातपर्यंत एकही मनुष्य त्यांच्या खोलीत गेला किंवा आला नाही. सीसीटीव्ही अजूनही चालू आहेत. काय झालं ते पोलिसांना माहिती आहे, त्यांच्याकडे अनेक कॉल्स आहेत. त्यांनी कोणा कोणाला फोन केले, त्याचे रेकॉर्ड आहे. पण, सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, त्या डॉक्टर महिलेला बाहेर मारलं आणि आतमध्ये आणून अडकवलं, असं कोण करेल का? पण अंधारेंच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. इतकं बालीश ज्ञान त्यांना आहे.
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अडकविण्याचं कारण म्हणजे त्या दिवशी झालेली मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची सभा. त्या दिवशी अनेक कामांना मंजुरी मिळाली त्यामुळे विराधेकांना आपलं काय होणार, याची काळजी वाटू लागली. त्यातूनच हे सुरू झालं आहे, असेही भोसले यांनी सांगितले.
Q1. महिला डॉक्टर हॉटेलमध्ये कधी आल्या होत्या?
A1. त्या रात्री दीडच्या सुमारास हॉटेलमध्ये आल्या आणि रूम घेतली.
Q2. दिलीप भोसले यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
A2. त्यांनी सांगितलं की रूम नियमांनुसार देण्यात आली आणि तपासात अडथळा आणला नाही.
Q3. सुषमा अंधारे यांनी काय आरोप केले?
A3. त्यांनी डॉक्टरला बाहेर मारून आत अडकवल्याचा गंभीर आरोप केला.
Q4. भोसले यांनी या प्रकरणाला कोणत्या राजकीय घडामोडींशी जोडले?
A4. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेनंतर विरोधकांनी राजकीय हेतूने प्रकरण रंगवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.