

Maan political News : "मी प्रांत, कलेक्टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. मी तालुक्यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, आम्ही ज्या दिवशी तुमची चौकशी लावू , त्या दिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. कोतवालाची लायकी नसणाऱ्याला पाणी फेरवाटप प्रस्ताव आणि मंजुरी कळणारच नाही, असा सणसणीत टोला आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना लगावला. दहिवडी येथील भाजप कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (Lates
"जयकुमारला डिवचू नका. नादाला तर अजिबात लागू नका. नादाला लागल्यावर कोण कुठे असतो याची जरा माहिती घ्या. तुमच्या पुस्तकात काय आहे ते लवकरच बाहेर काढू. जनतेने देशमुखांना मागच्या निवडणुकीत घरी बसवले आहे. त्यांनी घरात आनंद घ्यावा. या वयात न झेपणाऱ्या भानगडी करू नयेत. मला अनेक वेळा अडकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ते अडकले तर त्यांना या वयात झेपणार आहे का ? याचा विचार करावा. मी राजकारणातून काही कमवले नाही, पण कुणी काय आणि कोणत्या उचापती करून करोडोंची माया कमवलीय ते लवकरच बाहेर येणार आहे, असा खुला इशाराच गोरेंनी दिला.
"देशमुखांच्यात दम असेल तर त्यांनी विकासकामे आणावीत, निवडणुका लढाव्यात; पण क्षमता नसताना हवेत तीर मारू नयेत. ज्यांच्या जिवावर ते बोलत आहेत ते वेळ आल्यावर कुठेच नसतात. हे त्यांनी मतदारसंघातील त्यांच्याच सहकाऱ्यांना विचारून घ्यावे. मी आणलेल्या पाण्यावर देशमुखांनी त्यांचा ऊस भिजवायला आत्तापर्यंत किती वेळा पाणीपट्टी भरली ते एकदा जनतेसमोर जाहीर करावे. लबाड बोलण्यात निष्णात असणाऱ्या देशमुखांनी क्षमता आणि पात्रता असेल तितकेच बोलावे, असेही गोरे म्हणाले.
"जिहे कठापूर योजनेच्या आंधळी बोगद्याचे काम रणसिंगवाडी, वेटणे या गावांना पाणी देण्यासाठी थांबले होते. तो प्रश्नही आम्हीच मार्गी लावला आहे. आता लवकरच बोगदा पूर्ण होऊन पाणी माणमध्ये येणार आहे. आंधळी उपसा योजनेतून ३२, तर आता झालेल्या फेर पाणीवाटपातून उर्वरित १८ गावांना पाणी देता येईल. या योजनेची मंजुरी फडणवीसांनी दिली असताना लायकी नसलेले देशमुख हेही परवानगी जयंत पाटलांनी दिल्याचे धडधडीत खोटे सांगत आहेत. त्या जयंत पाटलांनी ही योजना रखडवण्याचे पाप केले आहे. टेंभू योजनेतून ४४ गावांना अडीच टीएमसी पाणी देत आहोत. तसा शब्द आम्ही २०१९ मध्येच दिला होता. अडीच वर्षे बेईमानांचे सरकार नसते, देशमुखांसारखे पाणी अडवणारे लोक नसते, तर हे पाणी अगोदरच आले असते. देवेंद्र फडणवीस यांनी माणमध्ये येऊन जनतेला जे जे शब्द दिले ते ते आम्ही पूर्णत्वाला नेतोय, असेही गोरे म्हणाले.
"मी सुरुवातीपासून दुष्काळ हटविण्यासाठी कार्यरत आहे. प्रत्येक निवडणुकीत विविध योजनांचे पाणी आणण्याचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल केली. ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करत आलो. जनतेला दाखवलेले स्वप्न आणि दिलेला शब्द पूर्ण करत वाटचाल केली. जनता आणि परमेश्वराचे आशीर्वाद पाठीशी असल्याने ऐऱ्यागैऱ्याच्या फेकाफेकीला कवडीचीही किंमत देत नसल्याचे, आमदार गोरे म्हणाले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.