चंद्रकांतदादांची प्रतिष्ठा पणाला लागणाऱ्या कोल्हापुरात पाटील-महाडिक लढत होणार

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातीलच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Mahadevrao Mahadik-Satej Patil
Mahadevrao Mahadik-Satej PatilSarkarnama

कोल्हापूर : राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष विधान परिषद निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. त्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातीलच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा, शिक्षक, पदवीधर, विधान परिषदेबरोबरच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पीछेहाट झालेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची ‘होमपीच’वर या निवडणुकीच्या निमित्तानेही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (In Kolhapur, Satej Patil and Mahadik group will held elections to the Legislative Council)

विधान परिषद निवडणुकीचा बिगूल आज वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला होता. सहा वर्षांत जिल्ह्यात आणि राज्यातीलही राजकीय संदर्भ बदलले आहेत, त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील. विशेषतः राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, तेव्हापासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीला धूळ चारण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरोधातील या निवडणुकीतील लढतीकडे राज्याचे लक्ष असेल.

Mahadevrao Mahadik-Satej Patil
शाहरूखची मॅनेजर, डिसूझा आणि गोसावी यांच्यात त्या दिवशी फोनवरून संपर्क झाल्याचे उघड

सद्यस्थितीत पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपकडे दिसत नाही. महाडिक यांच्या वयाचा विचार करता ते रिंगणात उतरतील की नाही? याविषयी संभ्रमावस्था आहे; पण त्यांच्याशिवाय या निवडणुकीत रंगत नाही, त्यामुळेच त्यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. मध्यंतरी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाच विधान परिषदेला उभे करून महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका यांना विधानसभेला दक्षिणमधून उभे करण्यावर प्राथमिक चर्चाही झाली होती. ही चर्चा मागे पडली आहे. त्यामुळेच पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात कोण? याचीही उत्सुकता असेल.

Mahadevrao Mahadik-Satej Patil
माजी आमदार कदमांचे सुपुत्र नगरपालिकेऐवजी झेडपीतून सुरू करणार राजकीय इनिंग

कोल्हापूरचे सुपुत्र आमदार चंद्रकांत पाटील भाजपचे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. त्यांना या निवडणुकीत तगड्या उमेदवारांसह भाग घ्यावा लागेल. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्या जोरावर पाटील या निवडणुकीत रंगत आणू शकतात. गेल्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्या बाजूने असलेले आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या राजकारणात आपण भाजपसोबत असल्याचे जाहीर केले आहे. पण, ते या भूमिकेवर ठाम राहतात की नाही? त्यांच्यासाठी चंद्रकांत पाटील किती ताकद लावणार? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आठवडाभरात या संदर्भातील भाजपतील चित्र स्पष्ट होईल. पालकमंत्री पाटील मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असतील.

Mahadevrao Mahadik-Satej Patil
खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

निवडणूक एकतर्फी नसेल : चंद्रकांतदादा

कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक भाजप ताकदीने लढणार. मतांची संख्या पाहता भाजप उमेदवार विजयी होण्यात अडचण दिसत नाही. उमेदवार कोण असेल, हे लवकरच स्पष्ट करू; पण ही निवडणूक एकतर्फी नसेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

योग्यवेळी भूमिका स्पष्ट करणार : प्रकाश आवाडे

ही निवडणूक एकतर्फी होणार नाही, ती चुरशीची होईल, यात शंका नाही. आपण कोणासोबत असू हे आताच सांगणार नाही, योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करू, असे इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केले.

चर्चेनंतरच निर्णय घेणार : विनय कोरे

या निवडणुका आजच जाहीर झाल्या आहेत. राज्याच्या राजकारणात भाजपसोबत असलो तरीही भाजप नेत्यांसोबतही याबाबत चर्चा झालेली नाही. ही चर्चा झाल्यानंतर योग्यवेळी भूमिका स्पष्ट करू, असे आमदार विनय कोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com