Jayant Patil : अहमदनगर - महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामाला गती देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व धरणाच्या कालव्यांचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल आज राहुरी तालुक्याच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल जयंत पाटील यांनी राहुरीकरांचे आभार मानले.
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण व कालव्यांचे काम ठप्प पडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जयंत पाटील यांनी भरीव निधी देत या धरणाच्या कामाला गती देण्याचे काम अडीच वर्षात केले. आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या कामाची पाहणी जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले, राहुरीकरांनी प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने एक कार्यतत्पर आमदार निवडला आहे. राज्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. सत्तेत असताना त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. सत्ता येते जाते मात्र तुमच्या कार्यशील प्राजक्त दादांना नेहमी साथ द्या, ताकद द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, निळवंडे धरणातून राहुरी तालुक्यातील विविध गावांना पाणी मिळावे यासाठी निंभेरे गावात तयार करण्यात आलेल्या बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे यांनी या कामात सातत्याने पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले. त्यामुळे या पाण्यामुळे हा परिसर नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.
राहुरी तालुक्याला पाणी मिळावे हे अनेक वर्षांपासूनचे राहुरीकरांचे स्वप्न आहे. या स्वप्नासाठी अनेकांनी खास्ता खाल्ल्या आहेत. ते स्वप्न आता पूर्णत्वास आले आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा नियोजित वापर करावा. ऊसासोबतच इतर पिकांची लागवड करत शेती व्यवसाय वृद्धिंगत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निळवंडे कृती समितीचे पदाधिकारी, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. आम्ही हे काम एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आणून ठेवले आहे. सध्याचे सरकार हे काम जलद गतीने पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.