Satara Lok Sabha News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'भटकती आत्मा' म्हणत टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना सुनावले आहे. "चार जूनला मतमोजणी होईल, त्यावेळी मोदींना कळून चुकेल की महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार आहे. जेवढी तुम्ही शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका कराल तेवढी जनता त्यांच्यासोबत उभी राहील आणि तुम्हाला धडा शिकवेल," असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
"भाजपचे निवडणुकीसाठी उभे असलेले अकरा खासदार म्हणतात आम्हाला दिल्लीला पाठवा, आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे," अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पुसेगाव येथे झालेल्या सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
जयंत पाटील म्हणाले, "या देशात लोकशाही मोडायची आणि पुन्हा हुकूमशाही आणायची त्यासाठी संविधानात बदल करायचा असेल तर आपल्याला 400च्या वर खासदार निवडून आणले पाहिजेत," अशी भाजपची मानसिकता आहे. आतापर्यंत त्यांनी ज्यांना खासदारकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यातील 11 खासदार सांगत आहेत की आम्हाला निवडून जायचे आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्यासाठी जायचे आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी सभेत केला आहे. कर्नाटकचे खासदारकीचे उमेदवार अनंतकुमार हेगडे यांनीही आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 400 पार म्हणणारे आता दोनशेचा आकडा गाठतोय का या विचारातून त्यांचे तोल जाऊ लागले आहेत. मोदीसाहेब दिवसातून चार चार सभा महाराष्ट्रात घेत आहेत, या सभामधून ते देशात पुढे काय करणार हे सांगण्यापेक्षा शरद पवार यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत, असा टोला जयंतरावांनी मारला.
Edited by: Mangesh Mahale
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.