
जयंत पाटील यांनी पक्ष फोडणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना थेट इशारा दिला की, "जे थांबणार आहेत ते थांबतील, बाकीचे निघून जातील."
अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याची कबुली देत त्यांनी, "आता जायचं असेल तर आताच जा" असा सल्ला दिला.
महापालिका निवडणुकीपूर्वी कोणीतरी पक्ष सोडला, तर त्यांचा कार्यक्रम घेणार असल्याचा दम त्यांनी भरला.
Sangli News : राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोखण्याचे काम झाले आहे. पण त्यांनी सर्व राजकीय बॅरिगेट्स तोडत आमदारकी खेचून आणली. आता पुन्हा त्यांना रोखण्यासाठी महायुती पूर्ण तयारीशी मैदानात उतरली असून त्यांचे खंदे समर्थक फोडले जात आहेत. मात्र आता शांत असणारे जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विरोधकांसह स्वकियांना निर्वानीचा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीतच कडक शब्दात कान टोचले असून 'निवडणुकीवेळी गेलात तर करेक्ट तुमचा कार्यक्रमच करणार'; असा दम भरला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून जाण्याच्या विचारात असणाऱ्या अनेकांना काय करावे आणि काय नाही? असा पेच निर्माण झाला आहे. (Jayant Patil warns defectors in Sharad Pawar’s NCP faction ahead of municipal polls, calls for unity and signals strong retaliation)
राज्यात महायुतीचे सरकार आले असून याआधी विधानसभा आणि आता होऊ घातलेल्या आगामी स्थानिक निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात मोर्चा उघडण्यात आला होता. मात्र विधानसभेला जयंत पाटील थोडक्यात वाचले. पण आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर खिंडीत अडवण्याचा प्रयत्न महायुती करताना दिसत आहेत. यासाठी जयंत पाटील यांच्याच मतदार संघात तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहेत. तसेच नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे जयंत पाटलांच्या विरोधकांना मोठी ताकद महायुतीकडून दिल्याचे दिसत आहे.
आता तर त्यांचे खंदे समर्थक असणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांसह त्यांचा गटच भाजपने फोडला आहे. यामुळे ओबीसीसह धनगर समाजाची ताकद आता विभागली जाणार आहे. तर आगामी स्थानिकसाठी सत्तेच्या महामार्गावर जाण्यासाठी अनेक पदाधिकारी प्रवेशासाठी धडपडत असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.
यावरून जयंत पाटील यांनी, ज्यांना सोबत थांबायचे आहे ते थांबतील बाकीचे जातील. पण ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय’, असा इशाराच त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांसह जाणाऱ्यांना दिला आहे. पक्षातील अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ज्यांना जायचे त्यांनी आताच पक्ष सोडून जावे. मी आता मोकळाच आहे. महापालिका निवडणुकीवेळी जर कोणी पक्ष सोडला तर त्यांचा कार्यक्रम करू, असा सज्जड इशारा जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
सध्या अनेकजण सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत. पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेच्या मनात नाराजी आहे. लोकांचा कौल वेगळा आहे, तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट दिसेल. भविष्यात पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यात येणार आहेत. यात नक्की यश मिळेल. त्यामुळे सत्तेतील पक्षाकडे कोणी जाऊ नका आणि कोणाला जायचे असेल तर त्यांनी आताच जावे. ऐनवेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही. अन्यथा मी आता मोकळाच आहे. बसून कार्यक्रम लावीन, असा दम पाटील यांनी कार्यकर्त्यांना भरला.
या शहरी पदाधिकाऱ्यांच्या बैठका शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, माजी नगरसेवक हरिदास पाटील, शेडजी मोहिते, अभिजीत भोसले, तानाजी गडदे आदी उपस्थित होते.
1. जयंत पाटील यांनी नेमकं काय विधान केलं?
जयंत पाटील यांनी पक्ष फोडणाऱ्यांना थेट इशारा दिला की, "मी आता मोकळा आहे, निवडणुकीपूर्वी कोणी गेला तर त्याचा जाहीर कार्यक्रम होईल."
2. हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर दिलं गेलं?
राष्ट्रवादी शरद पवार गटातुन सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे अनेक पदाधिकारी व आमदार पक्ष सोडत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं गेलं.
3. जयंत पाटील यांची पुढील रणनीती काय आहे?
ते लवकरच मुंबई व मतदारसंघ पातळीवर मेळावे घेणार असून कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा निर्धार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.