
Sangli News : नुकताच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. या प्रवेशाने भाजपने महाविकास आघाडीसह अजित पवार यांना देखील धक्का दिल्याचे बोलले जात आहे. पण आता खरा धक्का भाजपला जयश्री पाटील यांनी दिला आहे. महायुतीत अद्याप महापालिका जागा वाटपाचा फॉर्म्युलाच ठरलेला नाही. पण याधीच जयश्री पाटलांनी बॉम्ब टाकत थेट 50 टक्के जागांवर दावा केला आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय उत्तर द्यावं, या चिंतेत आली आहे. (municipal elections jayashree patil pressure on bjp)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिकच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आला आहे. स्थानिक आघाड्यांसह राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले आहेत. तर जे नाराज आहेत अशांना गळाला लावण्याचे काम सध्या महायुतीतील पक्षांसह जनसुराज्य शक्ती पार्टी करताना दिसत आहे. तर स्थानिकच्या तोंडावर अनेक प्रवेश देखील होताना दिसत आहेत.
सांगलीत विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि त्यानंतर भाजपमध्ये जयश्री पाटील यांच्या रूपाने झाला. यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांच्यासह मदनभाऊ पाटील गटाचा योग्य सन्मान राखला जाईल असे म्हटले होते.
दरम्यान आता महापालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. नुकताच भाजपमध्ये विसावलेल्या श्रीमती जयश्री पाटील यांनी वातावरण निर्मिती होत असतानाच भाजपची डोके दुखी वाढणारी मागणी केली आहे. जयश्री पाटील यांनी आपल्या मदन पाटील गटासाठी 30 ते 35 जागांचा आग्रह धरला आहे.
सांगलीतील मुळच्या गावठाणासह खणभाग, टिंबरएरिया, वसंतकॉलनी, शामरावनगर, गणेशनगर, संजयनगर सांगलीवाडी या प्रभागासह कुपवाड आणि मिरजेतील काही प्रभागावर पाटील गटाची पकड मजबूत आहे. त्यामुळेच जयश्री पाटील यांच्याकडून भाजपकडे ही मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेची निवडणूक महायुती की स्वतंत्रपणे लढायची याबाबत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीन पक्षात अंतिम जागा वाटपाची चर्चा झालेली नाही. त्यातच जयश्री पाटलांमुळे महानगरपालिकेत भाजपला बारा हत्तींचे बळ मिळाले आहे. तर अजित पवार यांची ताकद कमी झाली आहे. यामुळे भाजपकडून या मागणीचा विचार होऊन त्यांना मानाचे पान दिले जाऊ शकते.
एक प्रभाग 4 नगरसेवक या धोरणाप्रमाणे आता येथे नवीन प्रभागरचना होणार आहे. त्या प्रमाणे नगरसेवकांची संख्या देखील वाढणार असून ती 78 वरून 85 ते 90 च्या घरात जाऊ शकते. त्यामुळे आपल्या गटाच्या माजी नगरसेवकांसाठी 30 ते 35 जागांची मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.