
Gokul Dairy : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ अखेर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे अनेक चर्चेतील अन्य नावे मागे पडली आणि सुवर्णमध्य साधत हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार बंटी पाटील यांच्या पॅनेलच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नविद मुश्रीफ यांना संधी देण्यात आली.
पण नविद मुश्रीफ यांच्याआधी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे यांचे चिरंजीव अमरीशसिंह घाटगे यांचे नाव चर्चेत आले होते. ते भाजपचे असल्याने आणि संजय घाटगे यांचे मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने ते अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा सुरु होती. पण अखेरच्या काही तासांमध्ये अंबरिश घाटगे यांचेही नाव मागे पडले. फडणवीस आणि शिंदे यांनीही नविद मुश्रीफ यांच्याच नावाला हिरवा कंदील दाखवला.
मग भाजपच्या घाटगे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीच्या नविद मुश्रीफ यांचे नाव का पुढे आले? घाटगे यांचा गेम का झाला? नेमका कोणी केला? असे सवाल विचारले जात आहेत. या प्रश्नाचे उत्तर सापडते 2021 मधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत. त्यावेळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने रिंगणात उडी घेतली होती. या आघाडीत तत्कालिन खासदार संजय मंडलिक यांच्यासह तत्कालिन मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तत्कालिन आमदार राजेश पाटील, विद्यमान मंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर आणि विद्यमान आमदार चंद्रदीप नरके आणि विनय कोरे यांची साथ होती.
तर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि तत्कालिन आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वात राजर्षी शाहू सत्ताधारी आघाडीने निवडणूक लढवली होती. यात माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर, संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे, भरमू पाटील यांचा समावेश होता. खरंतर निवडणुकीपूर्वी संजय घाटगे आणि सत्यजीत पाटील सरुडकर हे मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबतच होते. पण उमेदवारी कापल्याने संजय घाटगे यांनी महाडिक यांच्या आघाडीतून मुलाला उमेदवारी मिळवून दिली.
त्यावेळी मुश्रीफ आणि सजेत पाटील यांचे स्थानिक गट एकत्र होते. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती या ठिकाणी देखील या दोघांची एकत्रित सत्ता होती. त्यावेळी निकालात 21 पैकी तब्बल 17 जागा जिंकत मुश्रीफ आणि पाटील यांच्या जोडीने गोकुळच्या निवडणूक बाजी मारली. विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या साथीने महाडिक गटाच्या अनेक वर्षांच्या सत्तेला धक्का बसला. महाडिक आणि पी. एन. पाटील पॅनेलचे केवळ 4 उमेदवार विजयी झाले.
यातच एक होते अंबरिश घाटगे. आता मागच्या चार वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हसन मुश्रीफ आणि सजेत पाटील यांची जिल्ह्यात मैत्री कायम असली तरीही राज्यातील सत्तेत मुश्रीफ महायुतीत आहेत, तर सतेज पाटील महाविकास आघाडीत. शिवाय वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी एकमेकांशी जुळवून घेतले होते. घाटगे यांनी मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबाही जाहीर केला होता.
त्या बदल्यात मुश्रीफ यांनी घाटगे यांना जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक म्हणून घेतले. तसेच घाटगे यांच्या संस्थांना कर्ज मंजूर झाले. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांचीही मैत्री झाली होती. याच मैत्रीतून मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना कॉर्नर करण्यासाठी संजय घाटगे यांना भाजपमध्ये पाठवल्याचे सांगितले जाते. आता हे बदलेले संबंध आणि राज्यातील नेत्यांचा गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष पाहिजे असा आग्रह यातून अंबरिश घाटगे यांचे नाव पुढे आले होते.
मात्र अंबरिश घाटगे जरी भाजपचे असले तरी ते गोकुळमध्ये विरोधी पॅनेलमधून निवडून आले. त्यांना अध्यक्षपद देणे म्हणजे महाडिक यांच्या गटाला अध्यक्षपद देण्यासारखे होऊ शकते, असे म्हणत काही नेत्यांचा त्यांच्या नावाला त्याला विरोध झाला. त्यामुळेच त्यांचे नाव पिछाडीवर पडले. शाहू परिवर्तन आघाडीतील प्रमुख नेत्यांनीही घाटगे यांच्या नावावर आक्षेप घेतल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, सतेज पाटील यांनीही घाटगे यांच्या या नावाला विरोध केला होता. यातूनच ज्या वेगाने घाटगे यांचे नाव चर्चेत आले त्याच्या दुप्पट वेगाने त्यांचे नाव पिछाडीवर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.