Mahapalika Election News : भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी अन् तितकाच धोका; संभाजी भिडे गुरुजींचा आदेश महत्वाचा
Sangli News : केंद्र आणि राज्यातील सत्तेचा प्रभाव स्थानिक पातळीवर देखील दिसून येत आहे. त्यामुळे सांगली महानगरपालिकेतील इच्छुकांचा ओढा महायुतीकडे आहे. युतीतील भाजपमध्ये इच्छुकांचा महापूर आला आहे. मात्र त्याचबरोबर बंडखोरीचा धोकाही तितकाच अटळ आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस मधील अनेक मोठे नेते गळाला लावल्यानंतर आणि यापूर्वीच पक्षातील नेते मातब्बर असल्याने दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीची दावेदारी दाखवली जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही इच्छुक सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे भाजपकडून डावलले गेलेले, काही चांगले चेहरे गळाला लागतील का, यासाठी महाविकास आघाडीचे नेते गळ टाकून बसले आहेत. गावभाग, हरिपूर रोड, पेठांचा परिसर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. शिवाय आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे आणि आता नव्याने दाखल झालेल्या जयश्री पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांची तोबा गर्दी झाली आहे. या एका प्रभागातून तब्बल ६७ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
यापूर्वी संभाजी पवारांचा वरचष्मा असलेल्या भागात आता भाजपची उमेदवारी म्हणजे विजयाची संधी असे समीकरण आहे. बावडेकर, ओतारी, दिगडे, बोळाज, देवळेकर असे नवनवे चेहरे येथून नगरसेवक झाले. यावेळीही नव्या चेहऱ्यांसाठी रेटा असल्याने विद्यमान युवराज बावडेकर, भारती दिगडे, बेलवलकर यांच्या गोटात चिंता आहे.
शिवप्रतिष्ठान आणि काँग्रेस 'शिवप्रतिष्ठान'चे केंद्र हे गावभाग राहिले असले, तरी सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरांत प्रतिष्ठानच्या अनेक धारकऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. भिडे गुरुजी कोणा-कोणासाठी शब्द टाकणार? दुसरीकडे, ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व या मुद्द्यावर केदार खाडीलकर, कालिदास हरिदास, प्रथमेश वैद्य यांनी ताकद लावली आहे.
सर्वसाधारण गटात ही संधी मिळाली तर महिला सर्वसाधारणसाठी अनेक पर्याय पुढे येतील. इथे काँग्रेसने यापूर्वी अडीच ते तीन हजार मते घेतली आहेत. यावेळी भाजपमधील भाऊगर्दी पाहता ते तिथल्या नाराजावरच लक्ष ठेवतील असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

