Kolhapur News : पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष आमदार झालेले आणि नंतर भाजपचे सहयोगी सदस्य राहिलेल्या प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात आहे? असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला पडला आहे. आवाडे यांनी 'हबकी डाव' टाकून भविष्यातील तडजोडीसाठी तरी हा इशारा दिला नसेल ना? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आवाडे ( Prakash Awade ) यांनी 2019 ची विधानसभा जिंकल्यानंतर न मागता भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य राहिले. त्यातही उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांच्या उमेदवारीला गेल्या महिन्याभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांकडून उघड विरोध केला जात आहे. आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे ( Rahul Awade ) यांनी सुरुवातीला स्वतःच लोकसभा लढणार, अशी घोषणा केली. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्याची तयारीही दर्शवली होती. पण, तत्पूर्वीच माने यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राहुल हे शांत झाले होते. मात्र, अंतर्गत त्यांचा माने यांना असलेला विरोध कायम होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली. रविवारी ( 15 एप्रिल ) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचीही आवाडेंनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी (ता. 16) अर्जही भरणार आहेत. त्यांचे हे धाडस पाहता, त्यांच्या मागे भाजपचीच ताकद तर नाही ना? असा प्रश्न पडत आहे.
...तर गणित बिघडणार
आवाडे यांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करायचा आहे; पण स्थानिक पातळीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांचा हा पक्ष प्रवेश रखडल्याचे बोलले जाते. त्यातूनच त्यांनी थेट लोकसभेला भाजपलाच आव्हान दिले असल्याचे बोलले जाते. आवाडे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास या मतदारसंघाचे राजकीय गणित बिघडणार आहे, त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.