Raju Shetti News : "पोलिसांनो! जे करायचं ते करा"; स्वाभिमानीच्या शिलेदारांना नोटिसा आल्यानंतर शेट्टी भडकले

Shetkari Sanghatna News : चार महिने उलटल्यानंतर प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
Raju Shetti
Raju Shettisarkarnama

Kolhapur, 29 April : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangale Lok Sabha Election 2024 ) पंचरंगी लढत होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani Shetkari Sanghatna ) नेते, माजी खासदार राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्यात या मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक रंगत असल्याने मत विभाजनाचा फटका इथं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशातच गाव पातळीवरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुका न्यायालयाकडून कारवाईच्या नोटिसा पाठवण्याचा धडका सुरू झाला आहे. मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना प्रशासनाकडून नोटीस आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

चार महिन्यांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कारखान्यांच्या विरोधात ऊसदरवाढीसंदर्भात आंदोलन केले होते. तसेच, शिरोळपासून ते कागल, चंदगड, राधानगरी, कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर वाळवा सांगली आणि पुन्हा शिरोळ अशी 522 किलोमीटरची पदयात्रा काढून ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळण्यासाठी आंदोलन केले होते, तर दोन महिन्यांपूर्वी तब्बल नऊ तास पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता. मागील हंगामातील उसाचे पैसे द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. मात्र, पोलिस प्रशासनाकडून परवानगीशिवाय पदयात्रा काढल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेला जवळपास चार महिने उलटल्यानंतर प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शिराळा, शाहूवाडी, पन्हाळा आणि शिरोळमधील प्रमुख कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

"पोलिसांना वाटतंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघात आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काहीतरी करतील. त्यामुळे प्रशासनाकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत. शेतकरी म्हणजे तुम्हाला अतिरेकी, नक्षलवादी वाटले की काय? प्रत्येक वेळी त्यांना नोटीस का काढता. आम्ही प्रशासनाच्या या नोटिसीला उत्तर देणार नाही. आम्ही पोलिस स्टेशनलाही जाणार नाही. त्यांनी खुशाल काय करायचं, ते करावे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे," अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'शी संवाद साधताना दिली.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com