Lok Sabha Election 2024 : लोकसभा ठरवणार, सोलापूर पवारांचे की फडणवीसांचे!

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर जिल्ह्यावर 2009 पर्यंत ज्यांनी अधिराज्य गाजविले त्या विजयसिंह मोहिते-पाटील व सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबातील नवी पिढी आता मैदानात उतरली आहे.
devendra fadnavis sharad pawar
devendra fadnavis sharad pawarsarkarnama

Solapur News : सोलापूर जिल्ह्याने जेवढे प्रेम शरद पवारांवर ( Sharad Pawar ) व त्यांच्या पक्षावर केले. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रेम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) व भाजपवर केले आहे. पवारांना हे प्रेम मिळवायला पन्नासहून अधिक वर्षे घालवावी लागली. फडणवीसांनी मात्र अवघ्या दहा वर्षांत हे प्रेम मिळविले आहे, हे विशेष. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीतून सोलापूर जिल्हा कोणाचा? पवारांचा की फडणवीसांचा? हे समजणार आहे. ही निवडणूक जशी शरद पवारांसाठी महत्त्वाची आहे, तशीच फडणवीस यांच्यासाठीही महत्त्वाचीच आहे.

सोलापूर जिल्ह्यावर 2009 पर्यंत ज्यांनी अधिराज्य गाजविले त्या विजयसिंह मोहिते-पाटील ( Vijaysingh Mohite Patil ) व सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar shinde ) यांच्या कुटुंबातील नवी पिढी आता मैदानात उतरली आहे. सुशीलकुमार शिंदे दोन वेळा पराभूत झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे राजकारणातील अस्तित्व आमदार प्रणिती शिंदे यांनी टिकवून ठेवले आहे. सुशीलकुमार शिंदे जेथून दोन वेळा पराभूत झाले तेथे आमदार प्रणिती शिंदे यांनी धाडस केले आहे. ‘प्रणिती खासदार, मी आमदार’ असे स्वप्न शहरमध्यमधील किमान दहा-बारा जणांना पडू लागले आहे. प्रणिती शिंदे यांची दिल्लीची संधी हुकल्यास मुंबईची संधी त्याहूनही अधिक कठीण असल्याने शिंदे परिवारासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते-पाटील यांच्यापुढे एकाचवेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार राम सातपुते ही दोन्ही आव्हाने होती. त्यातील एक आव्हान माळशिरसमधून बाहेर काढून तर दुसऱ्या आव्हानाला माढ्याच्या मैदानात समोरासमोर घेतले आहे. जिल्ह्यात मोहिते-पाटील यांच्यावर प्रेम करणारा जसा वर्ग आहे, तसाच त्यांना विरोध करणाराही वर्ग आहे. आमचा तालुका, आमचा स्वाभिमान, आमच्या तालुक्यात बाहेरच्यांचा हस्तक्षेप कशाला? या भावनेतून जिल्ह्यात समविचारी आघाडीचा जन्म झाला. या समविचारी आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जुन्या इर्षेला नवे रुप येऊ लागले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा फक्त तोटाच

डिसेंबर 2019 मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर व मोहिते-पाटलांच्या धाडसावर करमाळ्याचे अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद भाजपने कांबळे यांना दिले, त्यातून भाजपने काय साध्य केले? भाजपच्या हाताला नक्की काय लागले? याचा विचार केला तर झेडपीच्या इतिहासात कधी नव्हे ती उच्चांकी बदनामी, भ्रष्ट कारभाराचे थेट आरोप या काळात झाल्याचे दिसले. ज्यांना अध्यक्षपद दिले, त्यांचा आज भाजप अथवा महायुतीला माढा किंवा सोलापूर लोकसभा लढताना काय उपयोग होतो का? याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

सर्वांनीच केला अपेक्षाभंग

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले तेव्हा जिल्ह्यात बबनराव शिंदे, भारत भालके, संजय शिंदे, प्रणिती शिंदे, शहाजी पाटील हे सत्ताधारी आमदार होते. या आमदारांना मंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने हुलकावणी दिली. त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सत्तेत आली. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, शहाजी पाटील या नऊ सत्ताधारी आमदारांनाही मंत्रिपद मिळू शकले नाही. शिवसेना व राष्ट्रवादी जुनी असो की नवीन, भाजप आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी 2019-2024 या टर्ममध्ये सोलापूर जिल्ह्याचा मंत्रिपदाच्या बाबतीत अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कायमच अस्वस्थता राहिली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com