kolhapur Loksabha News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाची ‘गॅरंटी’ देत आहेत. खासदार राहुल गांधींचे ‘गॅरंटी कार्ड’ आहे. पण मतदारांच्या प्रश्नांची ‘गॅरंटी’ कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज ४० अंश तापमानात पारगडच्या (ता.चंदगड) महिला रोज दोनशे पायऱ्या चढून चार घागरी पाणी भरत आहेत. त्यांना एक टॅंकर मिळत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. त्याचे सोयरसुतक नेते आणि प्रशासनालाही नाही. त्यांच्या प्रश्नांची गॅरंटी कोण देणार, ‘आरक्षण’ आणि ‘संविधाना’च्या प्रश्नातच अडकलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या जगण्या-मरण्याचे प्रश्न बाजूला पडल्याचे चित्र आहे.
लोकसभेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीची (इंडिया आघाडी) आहे. लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीची आहे. विकासाला मत देण्याचे आवाहन रोज कोपरा, चौक सभेतून होत आहे. संविधान वाचवायचे आहे, एकाधिकारशाही रोखायची आहे म्हणून प्रचार सुरू आहे. मात्र, प्रचारातील सर्वच नेते जीवन मरणाच्या प्रश्नांकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्नांवर, विकासाच्या प्रश्नावर, महागाईच्या प्रश्नावर रान उठताना दिसत नाही.
कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्याचे पुढे काय झाले हे सांगायला नेते तयार नाहीत. विकासाच्या तुलनेत नाशिक, औरंगाबाद कोल्हापूरच्या पुढे गेले. सोलापूर पुढे जात आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवर बोलून प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी विकास केल्याचे प्रत्येक भाषणात सांगितले जात आहे. खासदार राहुल गांधींनी Rahul Gandhi जाहीरनाम्यातून गॅरंटी कार्ड दिले आहे. मोदींनी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाष्य करून मते मागितली. गॅरंटी कार्डच्या माध्यमातून कॉंग्रेस मते मागत आहे. संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत असे सांगितले जात आहे. पण पोटापाण्याच्या प्रश्नाचे काय ?
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करण्याचे आश्वासन याच नेत्यांनी याच ठिकाणी आजपर्यंत अनेक वेळा दिले. त्याचे पुढे काय झाले ? विमानतळ विकासाबद्दल नेत्यांना शाब्बासकी द्यावी लागेल, पण अजूनही तेथे कार्गोसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे उद्योगांच्या विकासाचे उड्डाण होऊ शकले नाही. पश्चिम महाराष्ट्र रेल्वेने कोकणाला जोडण्याचे धोंगडे अजून किती वर्षे भिजत ठेवायचे आहे. या मतदारांच्या प्रश्नांची गॅरंटी कोण देणार ?
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापुरात अपेक्षीत संधी नसल्याने अनेक तरुण पुणे, मुंबई, बंगळुरूला जात आहेत. आयटी पार्कची घोषणा हवेतच आहे. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण कधी होणार, पर्यटनवाढीसाठी महोत्सवाव्यतिरिक्त फारसे काही होत नाही. ‘ड्रायपोर्ट’चे गाजर झाले. आता या सर्व प्रश्नांची गॅरंटी कोण देणार ?
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.