या देशाचं राजकारण कधीच व्यक्तीकेंद्रित झालं नाही. असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही. त्यामुळे भाजपनं 'मोदी का परिवार'पेक्षा 'आम आदमी का परिवार' म्हणावं, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. त्याचवेळी 'हा देश कुणाच्या बापाचा नाही' असंही त्यांनी भाजप आणि केंद्रातील सरकारला सुनावलं. रविवारी भाजपनं त्यांच्या सोशल मीडियावर एक ट्रेझर प्रकाशित केला. त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भाजपचा समाचार घेतला. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत जनतेकडून केलं जात आहे, असा दावा राजू शेट्टी यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झाला आहे. मला महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नाही. आम्ही 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे, आम्हाला कुणाचा प्रस्ताव नसल्याचंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीनं (MVA) त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्वाभिमानी आपल्यासोबत नाही आली तर त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं. त्याचवेळी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन, असेही स्पष्ट केले. तसेच सर्वच आघाड्यांनी शेतकरी उमेदवार म्हणून उमेदवार देऊ नये, असं आवाहनही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केलं.
आम्ही लोकसभेच्या 5 ते 6 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मी माझी निवडणूक मतदारांवर सोडली आहे. त्यांनीच ठरवायचं आहे. माझं काय करायचं, असं राजू शेट्टी म्हणाले.
नारळ फोडून त्यापैकी किती कामं झाली हे जनता बघून घेईल. मी आता कुणावरही टीका करणार नाही. कारण पाच वर्षे मतदारांनी किती कामं झाली हे पाहिलं आहे. मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणारसुद्धा, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारनं नुकताच शक्तिपीठ मार्ग बनवण्याची घोषणा केली आहे. त्यावरून शेट्टी यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभा करायचे आहेत, असा सवाल शेट्टी यांनी केला.
सुळकुड योजनेबाबतची बैठक केवळ फार्स होता. या योजनेतून पाणी द्यायचं नव्हतं तर मंजुरी कशी दिली? हसन मुश्रीफ यांनी योजना मंजूर केल्यानंतर इचलकरंजीत साखर वाटली होती. आताच मुश्रीफांचा या योजनेला विरोध का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. त्याचवेळी सरकारने ही योजना पूर्ण करावी, अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आपला हक्क मिळवतील, असा इशारा त्यांनी दिला.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.