
Satara Politics : माण-खटावच्या राजकारणात जयकुमार गोरेंशी संघर्ष केलेल्या, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर घार्गे हे दोन्ही नेते आता बाजूला पडल्याच चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दोन्ही तालुक्यांच्या सुत्रे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अभयसिंह जगताप यांच्याकडे सोपवली आहेत. ही जबाबदारी मिळताच जगताप यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यांनी गोरेंच्या तालुक्यातील कामकाजावर उघडपणे टीका करत जाहीर “पोस्टमार्टम” सुरू केले आहे.
गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत माण-खटाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दोर प्रभाकर देशमुख यांच्या हातात होती. त्यांनी आपल्या सनदी अधिकारी असतानाच्या अनुभवांचा उपयोग करून तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण या कामातून त्यांनी विधानसभेची तयारीही केली. पण पक्षाने विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी प्लॅन बदलून देशमुख यांना डावलून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन समजूत काढली होती.
पण ज्या मात्र प्रभाकर घार्गे यांच्यावर पवारांनी विश्वास दाखवला ते जयकुमार गोरे यांच्याकडून जवळपास पन्नास हजार मतांनी पराभूत झाले. या घडामोडींनंतरही प्रभाकर देशमुख हे पक्षात होते. परंतु फारसे सक्रिय दिसले नाहीत. आता काळाची पावले ओळखून प्रभाकर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागील काही बैठकांना ते गैरहजर होते. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत प्रभाकर घार्गे यांचीही काहीच राजकीय हालचाल दिसत नव्हती.
त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी अभयसिंह जगताप यांच्याकडे नेतृत्व दिले असण्याची शक्यता आहे. आता जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर होताच माण-खटाव तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाची तालुक्याची सुत्रे हाती येताच अभयसिंह जगताप यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना डिवचले आहे. गोरे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून तालुक्यासाठी काय केलं याचं जाहीर पोस्टमार्टमच जगताप यांनी केलं.
ग्रामविकास खात्यावर आणि जयकुमार गोरे यांच्या कारभार शंका उपस्थित करताना अभयसिंह जगताप म्हणाले, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांचा या खात्याशी संबंध येतो. ग्रामविकास खाते मिळाल्याबद्दल आम्ही जयकुमार गोरे यांचे अभिनंदन पण केले. पण त्याचा चांगला परिणाम मतदारसंघात दिसत नाही. लोकांनी पैसे गोळा करून शाळा डिजिटल केल्या. पण त्या शाळांचे लाईट बिल ग्रामपंचायतींनी भरायचे असा आदेश काढण्यात आला आहे. पण ग्रामपंचायतींनी बिल न भरल्याने शाळांच्या विद्युत जोडण्या तोडल्यात. यामुळे ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गरीबांच्या मुलांच्या शिक्षणावर गदा आलीय.
वरकुटे मलवडी गावात पाच वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन झाले. मात्र आजतागायत तिथं विद्युत मीटर बसलेला नाही. तिथं फक्त एक परिचारिका असते, कोणताही डॉक्टर तिथं येत नाही. अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. आपण नुसतं म्हणायचं आमच्याकडे ग्रामविकास मंत्री पद आहे. परंतु सगळ्यात महत्वाचे असणारे शिक्षण व आरोग्य विभागासाठी यांनी काय केलं. या मतदारसंघात ग्रामसेवक गावात वेळेवर हजर राहत नाही. काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून असे म्हणत अभयसिंह जगताप यांनी जयकुमार गोरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.