
Satara ZP Reservation : सातारा जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर पंचायत समिती आरक्षण सोडतीनंतर महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी गोळाबेरीज सुरू केली आहे. आरक्षण निश्चितीने राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांना आपल्या जागा शाबूत ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे, तर भाजपला आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी संधी मिळणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने सर्वांचीच नाराजी दिसून आली. या गटात सर्वच पक्षांना उमेदवारीचा शोध घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी दादा धामुनसे आणि पंढरीनाथ लांगी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती जाधव यांच्याही नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो, तर भिलार गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी रूपाली राजपुरे, वंदना भिलारे, तेजस्विनी भिलारे, वैशाली भिलारे, कौशल्या भिलारे, मंगल भिलारे, पूनम गोळे या नावांची चर्चा सुरू झाली आहे, तसेच मेटगुताड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी शकुंतला रमेश चोरमले या नावावर शिक्कामोर्तब होणार, अशी चिन्हे आहेत.
तळदेव गट हा सर्वसाधारण म्हणून खुला झाल्याने तालुक्यातील इच्छुकांच्या उड्या येथे पडतील. या जागेसाठी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, नितीन भिलारे, बाबूराव संकपाळ, संतोष मोरे, प्रवीण भिलारे, ॲड. संजय जंगम, अजित सपकाळ, संजय उतेकर, संजय मोरे, भूषण मोरे ही नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी मागील वेळी राष्ट्रवादीच्या गोटातून उमेदवारीसाठी मोठे राजकारण घडले आणि त्यात शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. ही सल आजही राष्ट्रवादीला लागून राहिली असून, हा गट आपल्या ताब्यात पुन्हा आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र राजपुरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी असल्याने येथील लढती पुन्हा एकदा रोमांचक होतील, असा विश्वास आहे.
तळदेव गणही सर्वसाधारणसाठी खुला असल्याने, येथे संतोष मोरे, सागर कदम, संजय देसाई, भाऊ कदम, सुभाष कदम, संजय शेलार, संजय उतेकर, बजरंग सपकाळ, गणेश उतेकर, सचिन कदम यांची नावे चर्चेत येत आहेत. कुंभरोशी गणातही तीच स्थिती असल्याने सचिन उतेकर, सुभाष सोंडकर, आप्पा उतेकर, समीर चव्हाण, संजय मोरे आणि सुरेश सावंत यांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या भूमिकेवर लढतींचे चित्र अवलंबून असेल. महायुतीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढली तर वेगळे चित्र दिसेल अथवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही महाबळेश्वर तालुक्याचे चित्र अवलंबून राहणार आहे.
बाळासाहेब भिलारेंचे गारुड :
(कै.) बाळासाहेब भिलारे यांचे तालुक्यावर कायम वर्चस्व होते. पूर्वी ते तळदेव गणातून आरक्षणामुळे निवडून आले होते. तीच किमया करण्याची वेळ आता राजेंद्र राजपुरे यांच्यावर आली आहे. त्याद्वारे राष्ट्रवादीच्या हातून निसटलेला मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. दुसरीकडे तालुक्यासाठी सर्वस्व दिलेल्या (कै.) बाळासाहेब भिलारे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काय न्याय देणार? याचीही उत्सुकता लागून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.