Mahavikas Aghadi : आघाडीतील बिघाडीची सुरुवात सांगलीतून...

Mahavikas Aghadi Sangli dispute : सांगलीत 'मविआ'त वादाची ठिणगी; काँग्रेस 5, राष्ट्रवादीला हव्यात 4 जागा, ठाकरे गटाचा 2 जागांवर दावा. लोकसभेच्या निकालानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात उघडपणे बंड उघडले.
vishal patil vishwajeet kadam jayant patil
vishal patil vishwajeet kadam jayant patilsarkarnama

Sangli News : विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये वरिष्ट स्तरावर जागा वाटपाची चर्चा सुरु झाली असून जिल्ह्यातील नेते ही जागांवर दावेदारी सांगत आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. काँग्रेसने पाच आणि राष्ट्रवादीने चार जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने ही मिरज आणि खानापूर-आटपाडी मतदारसंघावर दावेदारी सांगितली आहे. लोकसभेच्या निकालानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात उघडपणे बंड उघडले. जिल्ह्यातील 8 जागा असताना 11 जागांवर दावेदारी सांगितल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन निवडणुकीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडीत वाद झाला होता. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासून या मतदारसंघावर दावा केला जात होता. सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही जागा आपल्या पक्षाला मिळावी, यासाठी दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडकडे विनंती केली होती. पण कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती. सांगली मतदारसंघात काँग्रेसची ताकद असताना उमेदवारी डावलण्यात आली, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले आहेत, हा वाद शमत असताना विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नेते ही जागाबाबत दावा करु लागले आहेत. लोकसभा निवडणुकी पासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्यात मतभेद सुरु आहेत. त्यातच जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी भाकीत केले. जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा लढविल्या जातील, असे संकेत दिले आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ अशा तीन विधानसभेच्या जागा आहेत. पलूस-कडेगावचे अरुणअण्णा लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभा तीन आणि विधानपरिषद एक असे चार आमदार आहेत. राष्ट्रवादी चार जागा लढविण्याचा प्रयत्न करीत असताना काँग्रेसही मागे राहिलेली नाही.

vishal patil vishwajeet kadam jayant patil
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचा शरद पवारांकडे ओढा ! अजित पवार गटात होतेय घुसमट ?

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढविणार असल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगून टाकले. काँग्रेसचे पलूस-कडेगावमध्ये स्वतः डॉ. कदम आणि जत मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आहेत. याशिवाय सांगली, खानापूर-आटपाडी आणि शिराळा हे तीन मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेसकडे राहिले होते. त्यामुळे कदम यांच्याकडून पाच जागांवर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी विधानसभा जागांचा दावा करण्यास सुरुवात केल्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दोन जागा लढविण्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविलेले चंद्रहार पाटील यांनी मिरज आणि खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे काँग्रेसने मिरज मतदारसंघाकडे लक्ष केले आहे. कोणत्याही परिस्थितीत मिरज काँग्रेसला मिळविण्याचा चंग आहे. खानापूर-आटपाडी काँग्रेसकडे राहिला आहे, परंतु ती जागा सेनेला सोडली शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत 2019 मध्ये राष्ट्रवादीने मिरजेची जागा लढविली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट दिसते.

लोकसभेला काँग्रेसला जागा मिळू न देण्याचे खापर जयंत पाटील यांच्यावर फोडले जात आहे. त्यावर जयंतरावांकडूनही वेळोवेळी सांगलीच्या जागेशी माझा काय संबंध? असे सांगण्यात आले. काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केल्यानंतरही जयंत पाटील यांच्याकडून कुरघोड्या केल्या जातात. हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे, त्यामुळे काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत जयंतरावांच्या विरोधात उघडपणे बंड करीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीसमोर खानापूर-आटपाडीत पेच

महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी गटाचा समावेश आहे. जागा वाटपात खानापूर-आटपाडी मतदारसंघावरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे, मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे. तेथून बाबर यांचे पुत्र सुहास यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा लढण्याचा चंग बांधल्याने महायुतीत वादाची चिन्हे आहेत. सांगली, मिरज, जत, शिराळा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. याशिवाय पलूस-कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ भाजपला मिळणार आहेत.

vishal patil vishwajeet kadam jayant patil
Rahul Gandhi : 'एनडीएचे लोक I.N.D.I.A च्या संपर्कात, मोदींच्या गोटात असंतोष'

2019 मध्ये आघाडीने लढविलेले मतदारसंघ

विधानसभा ः पक्ष

इस्लामपूर ः राष्ट्रवादी काँग्रेस

शिराळा ः राष्ट्रवादी काँग्रेस

तासगाव-क.महांकाळ ः राष्ट्रवादी काँग्रेस

पलूस-कडेगाव ः काँग्रेस

जत ः काँग्रेस

सांगली ः काँग्रेस

मिरज ः स्वाभिमानी पक्ष

खानापूर-आटपाडी ः अपक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com