कोयनानगर : महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागते त्या प्रमाणेच याही गोष्टी असतात. मात्र, जनहितासाठी महा विकास आघाडी भक्कम आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयनेत व्यक्त केले.
कोयनानगर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील ,गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई , खासदार श्रीनिवास पाटील , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कोयना धरणाला साठ वर्षे पूर्ण झाली. त्या काळात पुनर्वसन कायदे नव्हते त्यामुळे या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवर अन्याय झाला. मात्र, आता लवकरात लवकर त्यांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस असून त्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेऊन मागणी केली पाहिजे . अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मध्यंतरी कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे विकासकामांवर विपरीत परिणाम झाला, त्याचाच एक भाग म्हणून कोयना धरण पायथ्याशी असणाऱ्या नव्या चाळीस मेगावॉट क्षमतेच्या वीजगृहाचे काम बंद आहे.
लवकरच ऊर्जा व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हे कामही पुढे नेले जाईल .राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा टंचाई आहे, जलविद्युत प्रकल्प सोयीस्कर आहेत. राज्याला भविष्यात सौरऊर्जा प्रकल्पांवर ज्यादा लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहेत. त्यामुळे स्वस्त दरात वीजनिर्मिती होईल. यासाठी मोठमोठे उद्योगपती, मोठे ग्रुप पुढे येत असल्याने यातूनच चांगले प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात आम्हाला यश मिळत आहे , सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना येथे प्रदेशाप्रमाणे पर्यटन विकास करण्याचा आमचा मानस आहे. कोयनेचे बंद पडलेले बोटींग, मासेमारी आदीबाबत पोलिस अहवाल तयार होत असून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. स्थानिक वन, पोलीस, वन्यजीव, जलसंपदा आदी विभागांचे अहवाल व स्थानिकांच्या मागणीनुसार येथे पर्यटनाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोयना अभयारण्य ,सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या नहिंबे गावातील संबंधितांचे संकलन यादी बधपत्र आदीबाबत कार्यवाही सुरू आहेत , वन्यजीव विभागाच्या दिरंगाईच्या तक्रारीही आहेत. याबाबत लवकरच प्रशासकीय बैठक घेऊन संबंधितांना यांच्या मागणीनुसार भरपाई देण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राष्ट्रवादीविषयी नाराजी, खासदार शरद पवार ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राज्यसभेच्या अनुषंगाने गुप्त बैठक, विधानसभा विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, सदाभाऊ खोत यांचे आरोप व केतकी चितळेचे शरद पवारांविषयी वादग्रस्त ट्विट आदींबाबत विचारले असता.
अजित पवार म्हणाले, या प्रश्नांपेक्षा राज्य व देशात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. आम्हाला अशा राजकीय चर्चांपेक्षा जनसामान्यांचे व राज्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षात काही तुरळक मतभेद असले तरी भांड्याला भांडे लागते त्या प्रमाणेच याही गोष्टी असतात. मात्र जनहितासाठी महा विकास आघाडी भक्कम आहे असेही त्यांनी नमुद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.