

Satara, 15 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यात बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात तीव्र शब्दांत आपल्या भावना मांडल्या आहेत. मात्र, मतदानाचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांना दिले आहेत. त्यांनीही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगून भाजपची धाकधूक वाढवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यात या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीवेळी केलेली फोडाफोडी आणि दिलेली वागणूक याबाबत तीव्र शब्दांत भावना मांडल्या. मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर देशमुख, प्रदीप विधाते, उदयसिंह उंडाळकर, उदय कबुले यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असूनही भाजपने या दोन्ही पक्षांचे सदस्य फोडून स्वतःची सत्ता आणली होती. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेच्या परिसरातून पोलिसांनी उचलून नेले होते. त्यावेळी पोलिसांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की केली होती. तेव्हापासून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये दरी पडलेली आहे, ती अजूनही कायम असल्याचे राष्ट्रवादीच्या बैठकीतून दिसून आले.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत यंदा दोन्ही उमेदवार हे सातारा जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे साताऱ्यातून मत मिळविण्यासाठी सर्वाधिक रस्सीखेच असणार आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पडलेली दरी पाहून या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला साथ देणार का, याची सर्वाधिक उत्सुकता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत परवा कराडमध्ये महायुतीची समन्वय बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री शंंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील गेले नव्हते. आतापर्यंतच्या एकाही बैठकीला शिवसेना व राष्ट्रवादीचे कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील राड्याचा वचपा काढला जाणार का, याची उत्सुकता आहे.
महायुतीच्या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, उमेदवार धैर्यशील कदम यांचा फोन आला होता. मात्र, सर्व सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे त्यांना सांगितले होते. आजच्या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या घटनेबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
भाजपकडून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याचे सर्वाधिकार सदस्यांनी मकरंद पाटील यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.