

Barshi, 17 August : बार्शी नगरपालिका प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक मुजम्मील पठाण यांच्या विरोधात माजी नगरसेवक ॲड. महेश जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अपात्रता अर्जाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते लालू सौदागर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बार्शी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते लालू सौदागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगरसेवक मुजम्मील पठाण यांचे भाऊ तसेच बार्शीतील काँग्रेस पदाधिकारी वसीम रमजान पठाण, नईम जहांगीर पठाण व हसन रमजान पठाण यांनी ‘तू वकील महेश जगताप यांना तिसऱ्या अपत्याची माहिती का दिली?’ असे विचारत जीवे मारण्याची धमकी दिली.
यापूर्वीही पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांनी कुरेशी जमातीची पोलिस ठाण्यात बैठक बोलावली होती. बैठक संपल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातच पोलिसांसमोर नईम पठाण यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यावेळी पोलिस निरीक्षक कुंभार यांनी नईम पठाण यांना समज दिली होती. त्यानंतरही पुन्हा धमकीचा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक ॲड. महेश जगताप यांनी नगरसेवक मुजम्मील पठाण यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रता अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हा धमकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत नगरसेवक मुजम्मील पठाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष सुनावणीत काय होणार, कोणाच्या बाजूने निकाल लागणार, याकडे बार्शीचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.