Mangalveda News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दोन जुलै रोजी सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी यांनी अवघ्या आठ दिवसांत म्हणजेच १० जुलैला ‘यू टर्न’ घेत शरद पवार गटात परतले आहेत. मंगळवेढ्यात अजित पवार गटाला हा धक्का मानला जात आहे. (Mangalveda city president of NCP Chandrashekhar Koundubhairi joined Sharad Pawar group)
तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्ताधारी गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीची व्रजमूठ सैल झाल्याचा आरोप भाजपने केला होता.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवेढ्यातील (Mangalveda) राष्ट्रवादीचे लतीफ तांबोळी,अरुण किल्लेदार, रामेश्वर मासाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी, सोमनाथ माळी यांनी अजित पवार यांना पाठींबा देत सत्ताधारी गटात सहभाग नोंदविला. विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे समर्थन केले होते.
रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल, विजय खवतोडे, हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटात राहिले. अजित पवार यांच्या निवडीनंतर शहरामध्ये अभिनंदनाचे डिजिटल फलकदेखील लावण्यात आले होते. मात्र, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी यांनी काही दिवसांतच यू-टर्न घेत पवारांच्या गोटात परतण्याचा निर्णय घेत तसे प्रतिज्ञापत्रही भरून दिले आहे.
शहराध्यक्ष कौंडुभैरी यांनी सर्वपक्षीयांच्या बरोबरीने पोलिस निरीक्षकाविरोधात आंदोलन केले आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिले नसल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. तो तर पदर या निर्णयामागे नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरुवातीच्या काळात संभ्रमावस्थेमुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आपण शरद पवार यांना मानणारे आहोत. यापूर्वी युवक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. अजित पवारांची भूमिका अयोग्य असली तरी मंगळवेढ्यात अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे काम करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.