Manganga Sugar Factory Election : माणगंगा साखर कारखाना सध्या बंद आहे. मात्र हा कारखाना सभासदांचा ठेवून तो सुरू करण्याचे आश्वासन जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिले. यासह त्यांनी कट्टर विरोधकांना एकत्र आणण्याचे दिव्य पार पाडले. यातून पाटील माणगंगा साखर कारखाना ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, गेल्या ३७ वर्षांपासूनचे सत्ताधारी राजेंद्र देशमुख गाफील राहिले. परिणामी त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे माणगंगेच्या आराखड्यात तानाजीराव पाटलांचे डावपेच सरस ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता त्यांच्यापुढे कारखाना सुरू करण्याचे अत्यंत कडवे आव्हान असणार आहे. येणाऱ्या काळात ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
माणगंगा साखर कारखान्याचे आटपाडी, सांगोला (Sangola) आणि माण हे तीन तालुके कार्यक्षेत्र आहे. आटपाडी आणि सांगोला तालुक्यात सभासदांची संख्या मोठी आहे. सांगोला तालुक्यातील सभासद शेतकरी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी निगडित आहेत. दरम्यान, पाच वर्षांपासून माणगंगा कारखाना बंद आहे. त्यातच टेंभू योजनेमुळे कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण वाढले. परिणामी वाढलेल्या उसाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली. हीच समस्या तानाजी पाटलांची हेरली आणि निवडणूक लढविण्यासाठी मोट बांधणी सुरू केली.
सांगोला तालुक्यात आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil), माजी आमदार दीपक साळुंखे आणि दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या तीनही विरोधकांना तानाजीराव पाटलांनी कारखान्यानिमित्त एकत्र आणण्याचे दिव्य पार पाडले. तसेच या बड्या नेत्यांसह शेतकऱ्यांची देणी देण्यासह कारखाना सभासदांचा ठेऊन चालू करण्याचा विश्वास मिळवला. या मोठ्या आघाडीवर तानाजी पाटलांनी सरशी घेतली. त्यांच्या तुलनेत राजेंद्र देशमुख खूपच कमी पडले.
देशमुख गेली ४० वर्षे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांना सोबत घेऊन ते कारखान्याची निवडणूक लढवत होते. यावेळी मात्र गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे देशमुखांच्या पॅनेलमधून भरलेले पाच उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी माघारी घ्यावे लागले. दरम्यान, त्यांना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करता आला नाही. तसेच विरोधक तगडे असतानाही त्यांनी 'बी प्लॅन' तयार ठेवला नाही. दरम्यान, तानाजीराव पाटील कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. परिणामी कारखान्यावरची राजेंद्र देशमुखांना ३७ वर्षांची सत्ता सोडावी लागली.
या यशाबाबत तानाजीराव पाटील म्हणाले, "कारखाना सभासदांचा ठेवून नीट चालू करू शकतो, याचा विश्वास बांधावरच्या शेतकऱ्यांपासून कार्यकर्ते आणि नेते मंडळींना दिला. मी जे बोलतो ते करून दाखवतो. तुलनेत विरोधक समोरच्यांचा विश्वास मिळवण्यात पात्र ठरले नाहीत."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.