Pune News : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामाच्या शैलीने एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 18 तास ते काम करतात. उरलेला वेळ आरामासाठी देतात. मात्र, सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची, याला कारण म्हणजे जरांगे पाटील हे त्यांच्या दौऱ्यात केवळ 3 तासंच आराम करताना दिसून येत आहेत.त्याच्या या व्यस्त दौऱ्याचा सरकारनामाच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा विशेष आढावा..
मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथील शिवबा संघटनेचे संस्थापक मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने, उपोषण, मोर्चे काढत आहेत. मराठा समाजाला आरक्षण या एकाच ध्येयासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले घरदार सोडले, प्रसंगी स्वत:ची जमीन विकली आहे.
जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत तब्बल 35 विविध मोर्चे आंदोलने केली आहेत. गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हे एकच ध्येय मनोज जरांगे पाटील यांनी उराशी बाळगले आहे. त्यासाठी आताही जरांगे पाटील रात्रीचा दिवस करून मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती दौरा करत आहेत. त्यांचा हा महाराष्ट्र दौरा अतिशय व्यस्त असून या दौऱ्यात ते दररोज ते 20 ते 22 तास आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजासाठी वेळ देत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरुवातीला 17 दिवस आणि त्यानंतर 9 दिवसांचे लाक्षणिक बेमदत उपोषण केले. सहाजिकच यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आरक्षणाचा हा अंतिम लढा म्हणून मैदानात उतरलेल्या जरांगे पाटलांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेताच 15 ते 23 नोव्हेंबर असे महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केले आणि दौरा सुरूही झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दौऱ्यात दररोज 3 ते 4 गावांमध्ये सभांचे नियोजन होते. कमी वेळेत जास्तीत जास्त मराठा समाजबांधवांपर्यंत पोहोचून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा जरांगे पाटील यांनी चंगच बांधला. यासाठी त्यांनी दिवस आणि रात्र असे वेळेचे बंधन ठेवले नाही. त्यांच्या या तळमळीला मराठा समाजाकडूनही तसाच प्रतिसाद मिळताना दिसून आला.
जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात त्यांची दौऱ्याची सुरुवात सकाळी 8 वाजल्यापासूनच होते. सकाळी 10 वाजता त्यांची नियोजित सभा पार पाडण्याचा प्रयत्न असतो.मात्र, रस्त्यात अनेक मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी थांबलेले असतात. त्यांच्या गाठी-भेटी घेत सभास्थळी पोहचायला जरांगे यांना 2 अडीच तासांचा विलंब होत आहे.
त्यामुळे दिवसभरात होणाऱ्या सभा पूर्ण करायला पाटील यांना पहाटेच्या 4 वाजत आहेत. त्यानंतर स्थानिक मराठा समाज बांधव आयोजक यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर जरांगे पाटील हे विश्रांती घेण्यासाठी रवाना होतात. त्यानंतर काही तासातच दुसऱ्या दिवशीचा दौरा सुरू होतो.
जरांगे पाटील यांच्या या व्यस्त दौऱ्याचे एक उदाहरण पाहायचे झाल्यास 19 नोव्हेंबरला जरांगे पाटील यांची संतनगरी देहू मध्ये रात्री 8 वाजता सभा होणार होती. मात्र, त्या दिवशी महाड येथील सभा संपायला दुपारी 3.30 वाजले तेथून भोरची सभा आटोपून देहूत पोहोचायला रात्रीचे 1 वाजले. त्यानंतर त्यांनी देहूतील हजारोंच्या सख्येंने उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या सभेला संबोधित केले. (Maratha Reservation)
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या देहूतील बर्गे या विद्यार्थ्याच्या घरी 20 तारखेला पहाटे 3 वाजता भेट देऊन त्यांच्या पालकांचे सांत्वन केले. त्यानंतर 4 वाजताच्या सुमारास मुक्कामासाठी त्यांचे अलंकापुरीमध्ये आगमण झाले.
मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांचा हा आरक्षणाचा लढा गोर गरीब गरजवंत मराठा समाजासाठी आहे. आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी सुरू केलेल्या दौऱ्यामध्ये त्यांना प्रवासामध्येही आराम भेटत नाही. याचे कारण म्हणजे जरांगे पाटील यांचा नियोजित दौरा असल्याने त्यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर जागोजागी मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी उभे असतात. त्यामुळे जरांगे पाटील देखील कोणालाच न दुखावता प्रत्येकाच्या सन्मानाचा स्वीकार करत पुढे जातात.
परिणामी प्रवासातही त्यांना आराम करायला उसंत भेटत नाही. मराठा समाजासाठी अशा प्रकारे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून जरांगे पाटील लढा देत आहेत, त्यामुळेच मराठा समाजही या योद्धाच्या मागे मोठ्या विश्वास आणि ताकदीने उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.