
Kolhapur News, 17 Sep : गेल्या अनेक दशकापासून मराठा आरक्षणा संदर्भात मराठा समाजाचा लढा आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनात हैदराबाद गॅझेट लागू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
मात्र, जोपर्यंत कायदेशीर टप्प्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असा निर्धार करत कोल्हापुरातील मराठा समाज बांधव येत्या खंडेनवमीला शस्त्र पूजन करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतिम लढाईला सुरुवात करणार आहेत.
मराठा आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख झाल्यानंतर कोल्हापुरात देखील ब्रिटिशांच्या 1881 व करवीर संस्थांच्या 1902 च्या गॅझेट मध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला होता. मात्र, त्यानंतर कुणबीची नोंद कुठे गायब झाली असा सवाल मराठा समाजाचा आहे.
आज 21व्या शतकात मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आता पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात 1 ऑक्टोबरला खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते शस्त्र पूजन करून कायदेशीर लढाई केली जाणार आहे’, अशी माहिती बाबा इंदुलकर व दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
तुळजाभवानी मंदिरात दुपारी 12 वाजता पूजन केले जाणार आहे. इंदुलकर म्हणाले, ‘खंडेनवमीला शस्त्र पूजन करून सैन्य लढायला बाहेर पडायचे. मराठा आरक्षणासाठी अनेक दशके लढाई सुरू असून, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा मागास असल्याने त्यांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. या समाजाला बाहेर काढण्याऐवजी तो आणखी कसा खोलात जाईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तरीही मराठा समाज थकलेला नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 ला इतर जातींबरोबर मराठ्यांना आरक्षण दिले होते. याचा शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. ‘मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढाई सुरूच राहणार आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी लागणाऱ्या शस्त्रांना शासन निर्णय, धोरणांचा गंज चढला आहे.
तो काढण्यासाठी 1 ऑक्टोबरला शस्त्रपूजन करून कायदेशीर लढाई केली जाणार आहे. समस्त मराठा समाज, बारा बलुतेदार, लोक प्रतिनिधींनी यात सहभागी होणे आवश्यक आहे.’असे दिलीप देसाई यांनी सांगत आंदोलनाचा हत्यार उपासले आहे.
‘मराठा व कुणबी एकच असल्याचे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांआधारे आम्ही समाजाच्या हक्कांसाठी भांडत आहोत. पूर्वीचे जे कुणबी होते, तेच पुढे मराठे झाले. त्यांच्या जुन्या नोंदी कुणबी म्हणूनच सापडत असतील, तर त्यांना कुणबी दाखले देण्यात कोणतीच अडचण असण्याची गरज नाही’, असे देसाई म्हणाले.
‘जिल्ह्यात एक लाख 40 हजार 312 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पैकी पावणेसात हजार जणांना कुणबी दाखले देण्यात आले आहेत. यातून कुणबी दाखले देण्यात इतका विलंब का लागत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, त्यांना तत्काळ दाखले द्यायला हवेत. आम्ही आता शस्त्र पूजन करून लढाईसाठी सज्ज झालो आहोत’, असंही इंदुलकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.