

सलाउद्दीन चोपदार
म्हसवड पालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण कोपरा सभा, पदयात्रा व उमेदवारांच्या गाठीभेटी आणि आरोप- प्रत्यारोपाने तापत चालले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष या चार पक्षांनी एकत्रित येऊन सिद्धनाथ नागरी आघाडी करून आव्हान निर्माण केले आहे. शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीस स्वतंत्र सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासह येथील सर्वच प्रभागांतील लढती चुरशीच्या होतील असे चित्र आहे.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्वत: उपस्थित राहून उमेदवार निवड, उमेदवारी अर्ज भरणे, उमेदवारांची पदयात्रा यासह जाहीर प्रचार सभेत उपस्थिती लावीत एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापवले आहे. या निवडणुकीत सर्वप्रथम मंत्री गोरे यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी नगराध्यक्षपदासह सहा प्रभागांत आठ उमेदवारांचे अर्ज भरून शक्तिप्रदर्शन केले होते. मागील निवडणुकीत त्यांनी मंत्री गोरे यांच्याविरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांना एकत्रित करून नगराध्यक्षपदासह दहा जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती; परंतु यंदा मात्र नाट्यमय घडामोडींनंतर त्यांच्या गटाने माघार घेतली आहे.
पालिकेच्या प्रभागवार लढतीत प्रभाग एक अ मधून भाजपच्या चैताली अनिल शिंदेंविरुद्ध सिद्धनाथ आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) भाग्यश्री किशोर सोनवणे यांच्यात सरळ सामना होणार आहे. चैताली या नवख्या उमेदवार आहेत, तर भाग्यश्री सोनवणे यांना त्यांचे वडील किशोर सोनवणे यांच्याकडून राजकीय वारसा लाभला आहे. याच प्रभागातील (ब) मधून भाजपचे विजय धट यांच्याविरुद्ध सिद्धनाथ आघाडीतील राष्ट्रवादीतून विलास रूपनवर निवडणूक रिंगणात आहेत. विजय धट हे मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मंत्री गोरे यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली होती.
या प्रभागात भाजपचे सतीश शिवाजी मासाळ विरुद्ध राष्ट्रवादीचे अविनाश मासाळ व अपक्ष, माजी नगराध्यक्ष महादेव मासाळ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सतीश मासाळ व अविनाश मासाळ हे राजकारणातील नवीन चेहरे आहेत यामुळे या प्रभागातील तिरंगी लढत चुरशीची होणार आहे. या प्रभागातील (ब) मधून भाजपच्या डॉ. सविता मासाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या अरुणा माने रिंगणात आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक म्हणून डॉ. वसंत मासाळ यांची राजकारणात प्रतिमा असून, याचा फायदा त्यांची पत्नी डॉ. सविता मासाळ यांना कितपत होईल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रभाग तीन (अ) मधून भाजपचे लखन लोखंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे वैजयंता लोखंडे यांची आणि (ब) मधून भाजपच्या दीपाली शिंदे यांच्याविरोधात शीतल लिंगे यांच्याशी सरळ सामना होणार आहे. या प्रभागात मातंग व माळी समाजाचे प्रामुख्याने मतदार असून, मतदारांची संख्या विचारात घेऊन एकमेकांविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवले गेले आहेत. या प्रभागात भाजपसह विरोधातील पक्षांचे कार्यकर्ते तुल्यबळ संख्येत गणले जातात विशेष बाब म्हणजे हे चारही उमेदवार नवखे आहेत.
प्रभाग चार (अ) मध्ये भाजपच्या माधुरी महेश लोखंडे यांच्याविरोधात शरद पवार राष्ट्रवादीतून सुनीता लक्ष्मण सरतापे यांच्यात लढत रंगत आहे. माधुरी लोखंडे या सामान्य कुटुंबातील आहेत, तर सुनीता सरतापे या सुशिक्षित कुटुंबातील असून, त्यांचे पती लक्ष्मण सरतापे हे ज्येष्ठ पत्रकार असल्यामुळे त्यांचा जनसामान्यांशी सातत्याने संपर्क राहिला आहे. याच प्रभागातील (ब) मध्ये भाजपचे आकील मैनुद्दीन काझींविरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन पांडुरंग कांबळे रिंगणात आहेत.
भाजपच्या श्रीदेवी निशांत पिसे या प्रभाग पाच (अ) मधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जया मल्हारी चव्हाण यांना टक्कर देणार आहेत. या दोन्ही महिला उमेदवार राजकारणात प्रथम भाग घेत आहेत. प्रभागातील (ब) मधून भाजपचे प्रज्योत किरण कलढोणे यांच्याविरोधात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल लक्ष्मण पिसे व शिवसेना ठाकरे गटाचे आनंद सुधाकर बाबर यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. या प्रभागात एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात रामोशी, देवांग कोष्टी व माळी समाज बांधवांची मतदार संख्या पाहता याच जातीमधील तुल्यबळ उमेदवार रिंगणात ठेवले आले आहेत.
प्रभाग सहा (अ) मधून भाजपचे आकाश पानसांडे, राष्ट्रवादीचे वृषाल टाकणे, ठाकरे शिवसेनेचे राहुल मंगरुळे यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. याच प्रभागातील (ब) मधून माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी पत्नी स्नेहल सूर्यवंशी यांना भाजपमधून उमेदवारी मिळविली आहे. युवराज सूर्यवंशी हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत; परंतु राजकारणात प्रवेश करताना प्रथम ते भाजपचेच कार्यकर्ते होते. पालिका प्रशासनाचा अनुभव असलेल्या स्नेहल सूर्यवंशी या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राजे घराण्यातील माजी नगरसेवक प्रतापसिंह राजेमाने यांनी पत्नी शिवमाला राजेमाने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
प्रभाग सात (अ) मधून भाजपच्या प्रमिला ढालेंविरुद्ध राष्ट्रवादीच्या आरती गोंजारी उभ्या असून, दोन्ही उमेदवार नवखे आहेत. याच प्रभागातील (ब) मधून भाजपतर्फे माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल राऊत यांच्यासह आजिनाथ केवटे व सचिन धोत्रे हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार या प्रभागात असून, मतांची विभागणी कशी करता येईल या विचाराने येथे उमेदवार उतरविल्याची चर्चा आहे. प्रभाग आठ (अ) मधून भाजपच्या अरुणा गायकवाड यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतून सारिका पिसे यांच्यात सरळ सामना होणार आहे. याच प्रभागातील (ब) मधून भाजपचे महावीर गिरजाप्पा वीरकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे संजय माने अशी दुरंगी लढत होत आहे.
प्रभाग नऊमध्ये भाजप (BJP) विरोधात रासप असा सरळ सामना होणार आहे. या प्रभागात (अ) मधून भाजपच्या पूनम वीरकर यांच्याविरुद्ध रासपच्या उत्कर्षा सुजित वीरकर अशी दुरंगी लढत होत आहे. तर (ब) मधून भाजपचे विजय रामचंद्र बनगर यांचे विरुद्ध रासपचे ऋषिकेश तुकाराम खरात यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. प्रभाग दहा (अ) मधून भाजपच्या स्वाती बनगर यांच्याविरुद्ध रासपच्या अंजना वीरकर यांच्यात दुरंगी लढत होत आहे, तर (ब) मधून भाजपचे अभिषेक वीरकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे संजय वीरकर यांच्यात लढत होणार आहे. या प्रभागात प्रामुख्याने धनगर समाजाचे मतदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.