कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यावरून सुरू झालेला वाद काही अंशी थंड झाला. आता पुन्हा एका 95 लाखांच्या संरक्षक भिंतीवरून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये पोस्टरवाॅर सुरू झाले आहे.
Kolhapur ला महापुरात दोन्ही बाजूंनी वेढा पडतो. यामध्ये सिद्धार्थनगर परिसराला त्याचा सर्वाधिक धोका असतो. या ठिकाणी संरक्षक भिंतीची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिनिधींनी अखेर नारळ फोडून श्रेय घ्यायला सुरुवात केली आणि वादाला तोंड फुटले. मात्र याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सिद्धार्थनगरमधील नागरी वस्तीत पुराचे पाणी येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्य, इमारतींचे आर्थिक नुकसान होते. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात या भागातील नागरिकांची घरे बाधित होतात. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी या भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा दावा केला जातो.
शासनाच्या नागरी दलितवस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसंरक्षक भिंत बांधणे या कामास निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील शरद कामत ते भालदार घरापर्यंत जयंती नदीला पूरसंरक्षक भिंत बांधणे या कामाचा शुभारंभ युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते 20 जानेवारी रोजी पार पडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
क्षीरसागर यांनी या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर काँग्रेसचे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार जयश्री जाधव यांनीही दुसऱ्या दिवशी याच कामाचा शुभारंभ केला, तर सिद्धार्थनगर परिसरात 95 लाख रुपयांची संरक्षित भिंत आणि दुसरी भिंत एक कोटी 92 लाखांची अशा कामाचा शुभारंभ करीत माजी आमदार क्षीरसागर यांना पोस्टरमधून प्रत्युत्तर दिले आहे. (Kolhapur Politics Latest News)
दरम्यान, या दोघांच्याही पोस्टरबाजीनंतर सामान्य नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांतून संरक्षक भिंतीची मागणी होत आहे. त्याकडे आजी-माजी आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून या संरक्षक भिंती उभारल्या जात असल्याचा दावाही तिथल्या सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. मात्र आजी-माजी आमदारांत सुरू असलेले पोस्टरवॉर कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरले आहे.
edited by sachin fulpagare
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.