Kolhapur News: बाप-लेक, चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार; उमेदवारीसाठी आटापिटा

Local Body Election 2025 Municipal Corporations election 2025: स्वबळावर निवडणूक लढली तर अशा इच्छुकांना जरूर संधी मिळेल; पण महायुती म्हणून एकत्र लढताना उमेदवारीसाठीचा संघर्ष अटळ आहे, तसा तो काही तालुक्यातील कुटुंबापर्यंत आताच पोहोचला आहे.
Kolhapur ZP
Kolhapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: पक्ष तीन, त्यात नेते ढीगभर, तर इच्छुक पोत्याने अशा परिस्थितीत उमेदवारी मिळवण्याचा संघर्ष आता कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. काही तालुक्यात यावरून वडील-मुलगा, चुलते-पुतण्या असे एकमेकांसमोर ठाकण्याची शक्यता आहे. त्यातून महायुतीची उमेदवारी मिळवणे हे इच्छुकांसाठी दिव्य ठरणार आहे. त्यातून महाविकास आघाडीला प्रबळ आणि ताकदीचे उमेदवार आयते मिळण्याची शक्यता आहे.

महायुतीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यातून भाजपने मुंबईसह अन्य काही मोठी शहरे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वतंत्र लढल्यास महायुतीत सहभागी भाजप, शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला ताकद दाखवावी लागेल. सद्यस्थितीत हे तिन्हीही पक्ष सत्तेत असले तरी स्वबळावर ही ताकद दाखवणेच मोठे आव्हान असेल. काहींनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे समजून कामाला सुरुवात केली आहे.

अशा इच्छुकांची मदार त्यांच्या नेत्यांवर आहे. स्वबळावर निवडणूक लढली तर अशा इच्छुकांना जरूर संधी मिळेल; पण महायुती म्हणून एकत्र लढताना उमेदवारीसाठीचा संघर्ष अटळ आहे, तसा तो काही तालुक्यातील कुटुंबापर्यंत आताच पोहोचला आहे. करवीर तालुक्यातील एका गावात महायुतीत चुलताही इच्छुक आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पुतण्यानेही तयारी केली आहे. या दोघांत बाजी कोण मारणार, त्यापेक्षा ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो पक्षाचे काम करेल का नाही हे अनिश्चित आहे. तर मुरगुडात देखील तीच परिस्थिती आहे. एकमेकांचे सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात असणार आहेत.

Kolhapur ZP
Ajit Pawar: नगरपंचायती, नगरपरिषदा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली; बैठकांचा सपाटा सुरु

अशा नाराजांची फक्त रसदच नव्हे तर त्यातून चांगले उमेदवारही महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. विशेषतः कागल, राधानगरी, शिरोळ, चंदगड, गडहिंग्लज या चार-पाच तालुक्यात हा संघर्ष अटळ आहे. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, अलीकडेच भाजपत गेलेले माजी आमदार संजय घाटगे असे तिघे एकत्र असतील; पण उमेदवारी देताना आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी तिघांनाही ताकदीने प्रयत्न करावे लागतील. अशीच स्थिती भुदरगड, राधानगरी तालुक्यात आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के.पी.पाटील यांनी विधानसभेच्या सलग तीन निवडणुका एकमेकांविरोधात लढल्या आता महायुती म्हणून हे दोघे एकत्र आहेत. राधानगरीत पाच तर भुदरगडमध्ये जिल्हा परिषदेचे चार गट आहेत. या नऊ गटाचे उमेदवार ठरवताना या नेत्यांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व भाजपचे राजवर्धन निंबाळकर यांच्यातही उमेदवारीवरून तणावाची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत महायुतीचा उमेदवार ठरवताना नेत्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला

राज्यात २०२४ च्या विधानसभा निकालानंतर भाजप, शिवसेना शिंदे पक्षात मोठ्या प्रमाणात 'इनकमिंग' झाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सत्ताधारी पक्षाची कास धरली तर विजय सोपा होईल ही त्यामागील भावना; पण आता इच्छुकच ढीगभर झाले तर सर्वांना उमेदवारी अशक्य आहे. त्यातून होणाऱ्या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडी कसा घेईल, या उत्सुकतेचा विषय असेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com