बिजवडी : कुकुडवाडसह १६ आणि कलेढोणसह १६ अशा ३२ गावांना पाणी देण्याचा शब्द मी दिला होता. या गावांचा सर्व्हेचे टेंडर फ्लॅश झाले आहे. लवकरच त्या गावांचा टेंभूच्या सहाव्या टप्प्यात समावेश होईल. या कामासाठी मी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, काही भामटे फ्लेक्स लावून जनतेला फसवित होते. तसेच ज्यांचा या योजनेशी संबंध नाही, असे लोक जनतेसमोर थापा मारत आहेत, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त माणमधील कुकुडवाड गटात गावोगावी आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, गेल्या १२ वर्षात जनतेला विकासकामांचा दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा अजेंडा राबवत आलो आहे. माणमध्ये निवडणूका आल्या की पैशांचा रोब दाखवत अनेक पावसाळी छत्र्या उगवतात. मात्र, अशा छत्र्या जनतेला भुलवून आणि विश्वासघात करुन निघून जातात.
मतदारसंघात कॅनॉलने पाणी आणणे, साखळी सिमेंट बंधारे उभारणे आणि शेकडो कोटींचे रस्ते करणे ही माझी मोठी कामे आहेत. मी कुकुडवाड आणि कलेढोणसह ३२ गावांना पाणी देण्याचा शब्द दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये याबाबत सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. परंतू, दुर्दैवाने नंतरची अडीच वर्षे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आघाडी सरकार आल्याने या कामाला 'खो' बसला होता.
आता पुन्हा आपले सरकार आहे. ३२ गावांचा सर्व्हे करण्याच्या कामाचे टेंडर फ्लॅश झाले आहे. तीन महिन्यात सर्व्हे होवून योजना सादर होणार आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात या गावांचा समावेश होवून सुप्रमा मिळवत या कामांना सुरुवात होणार आहे. जर गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचे सरकार नसते तर ही योजना मार्गी लागून या भागात पाणी आले असते. देवेंद्र फणवीसांनी या कामाच्या सर्व्हेचे आदेश दिले होते आणि आता तेच सत्तेवर आल्यावर टेंडर निघाले आहे.
मी या कामासाठी कसोशीने प्रयत्न केले, मात्र, काही भामटे काहीच प्रयत्न न करता पाणी आणल्याचे नाटक करुन, फ्लेक्स लावून जनतेला फसवित होते. काही महाभागांना तर योजना काय, कशी आहे हे माहित नाही. योजनेच्या कोणत्याच कामाशी दुरान्वये काही संबंध नाही असे लोक जनतेसमोर थापा मारत आहेत. माण तालुक्यात भाजप संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने राबविलेल्या अनेक योजनांचे आपण सर्वजण लाभार्थी आहोत. देशाला सर्वोच्च प्रगतीपथावर नेण्याऱ्या नरेंद्र मोदींचे हात आणखी बळकट करण्यासाठी माणमधील जनतेने भाजपच्या पाठीशी ताकद उभी करावी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपाचा झेंडा फडकवा असे आवाहनही आमदार गोरेंनी केले.
जिहे कठापूरचा आंढळी बोगदा पूर्ण.....
आंधळी बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने जिहेकठापूरचे पाणी माण तालुक्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आंधळी धरणातून पाणी उचलून उत्तर भागातील ३२ गावांना देण्याची योजनाही प्रगतीपथावर आहे. जिहेकठापूरचे पाणी माण तालुक्यात सोडण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.