Rajya Sabha Election : शिंदेंना वाईतून मिळालेल्या मताधिक्याचा नितीन पाटलांना फटका; राज्यसभेला मुकले...

Lok Sabha Election Result Nitin Patil NCP Satara Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठविण्याचे घोषणा अजित पवारांनी केली होती.
Ajit Pawar, Nitin Patil
Ajit Pawar, Nitin PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : वाई विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन पाटलांना राज्यसभेवर घेण्याचा दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही. त्याऐवजी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे.

नितीन पाटील यांना वाईतील मताधिक्याचा फटका बसल्याने ते राज्यसभेला मुकल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचा 32 हजार 771 मतांनी पराभव केला. सातारा, कराड दक्षिण आणि कोरेगाव मतदारसंघाने उदयनराजेंना साथ दिली.

Ajit Pawar, Nitin Patil
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील 'ॲक्टिव्ह मोड'वर, मंडलिकांच्या पराभवाची कारण शोधण्यासाठी बैठकांचा धडाका

प्रत्यक्षात कराडचे दोन व पाटण मतदारसंघातून उदयनराजेंना फारसे मताधिक्य मिळणार नाही, हे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे सातारा व वाई मतदारसंघातील मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न झाले. वाईत मात्र, पहिल्यापासून मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील हे पूर्ण ताकतीने उदयनराजेंच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते.

राष्ट्रवादीच्या हक्काची सातारा लोकसभेची जागा अजित पवारांनी नितीन पाटलांसाठी महायुतीकडून मागून घेतली होती. पण उदयनराजेंनी सातारा लोकसभेसाठी आग्रह धरल्याने त्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना राज्यसभेची जागा देण्याचे कबुल केले. त्यामुळे अजित पवारांनी वाईच्या सभेत जोरदार भाषण करताना वाईतून उदयनराजेंना एक लाखांचे मताधिक्य द्या, नितीन पाटलांना निकालानंतर राज्यसभेवर घेऊन खासदार करतो, असा शब्द दिला होता.

Ajit Pawar, Nitin Patil
Jaykumar Gore : रणजितसिंह निंबाळकरांना कमी लीड; जयकुमार गोरेंचा विधानसभेला घाम निघणार?

अजितदादांच्या या भूमिकेमागे वाई मतदारसंघातून उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्य मिळावी, ही अपेक्षा होती. पण, महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी सर्वात आधी वाई मतदारसंघात पोहोचली होती. त्यामुळे अजित पवारांनी आश्वासन देऊनही निकालात वाईकरांनी आमदार शशिकांत शिंदेंना साथ देत मताधिक्य दिले.

वाईतून शिंदेंना 6700 चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे नितीन पाटलांना राज्यसभेवर घेताना भाजपकडून वाईतील मताधिक्यावर बोट ठेवले गेले. तरीही गेल्या तीन, चार दिवस नितीन पाटील हे राज्यसभेसाठी बोलावणे येईल, याची वाट पाहत होते. तर त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील मुंबईत ठाण मांडून होते.

अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे नितीन पाटील यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाईकरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून वाईतील मताधिक्याचा नितीन पाटलांना फटका बसला आणि ते राज्यसभेच्या खासदारकीला मुकल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता खासदार उदयनराजेंच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला खासदारकी मिळणार याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com