पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह देशातील १९ पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. संसद भवन उभारणीपासून उद्घाटनाच्या कार्यक्रमात विश्वासात घेतले नाही म्हणून राग व्यक्त केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदाराचे सुपुत्र आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव सदाशिवराव पाटील यांना नव्या संसदने भूरळ घातली असून या वास्तूचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. (NCP leader praised the new Parliament building)
नव्या संसद भवनाचे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सगळीकडे या नव्या वास्तूची चर्चा सुरू आहे. देभरातील भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत नव्या संसद भवानाचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP), शिवसेना यांच्यासह देशभरातील तब्बल १९ पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र, पाटील यांच्या कौतुकाच्या पोस्टने विरोधी पक्षांचे डोळे विस्फारले आहेत.
वैभव पाटील (Vaibhav Patil) यांनी म्हटले आहे की, देशाच्या नवीन संसदभवनाच्या लोकार्पणाबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन! मला मनापासून आशा आहे की, संसदेची ही नवीन वास्तू फक्त भारतातीलच नाही, तर भारतीय उपखंडातील सर्व समुदायांसाठी आशेचा एक सर्वसमावेशक किरण बनेल आणि जगभरातील सर्वच लोकशाही राष्ट्रांसाठी मोठी प्रेरणा ठरेल.
वैभव पाटील हे राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते असून त्यांनी यापूर्वी विट्याचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे पिताश्री सदाशिवभाऊ पाटील हे माजी आमदार आहेत. पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ते ओळखले जातात. वैभव पाटील यांच्या पत्नीसुद्धा विट्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्ष होत्या. पाटील कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रपतींना या कार्यक्रमातच सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी आपला राग व्यक्त करत उद्घाटनच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला होत्या. खुद्द शरद पवार यांनीही प्रतिक्रिया देताना नव्या संसद भवनाच्या उभारणीपासून उद्घाटनाच्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, असे म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप केला आहे. निमंत्रण असते तर विरोधी पक्षाचे लोक नक्की उद्घाटनच्या कार्यक्रमाला गेले असते, असे म्हटले आहेत. तसेच, आपल्याला संसद भवनाची जुनी इमारतच आवडते असे सुळे यांनी म्हटले आहे. या भूमिकेच्या उलटी भूमिका वैभव पाटील यांनी मांडल्याची चर्चा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.