सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. कारखान्याच्या लढाईत अध्यक्ष कल्याणराव काळे यांना भगीरथ भालकेंनी साथ देण्याचे वचन दिले आहे. दुसरीकडे, बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेऊन बिनशर्त पाठिंबा दिलेल्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडूनही काळेंना ‘रसद’ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या काळेंना महाडिकांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. ते काय निर्णय घेतात, याकडे पंढरपूरचे लक्ष आहे. (Will Dhananjay Mahadik help Kalyanrao Kalye in election of Vasantrao Kale Sugar Factory?)
सहकार शिरोमणी सहकारी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्यापुढे अभिजित पाटील, दीपक पवार आणि डॉ. बी. पी. रोंगे यांनी पॅनेल उभारून आव्हान उभे केले आहे. आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांचे वस्त्रहरण सुरू आहे. सोशल मीडियातून प्रचार शिगेला पोचला आहे. अनेकदा मर्यादा ओलांडली जात आहे.
पंढरपूर बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बिनविरोध माघार घेऊन माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांना पाठिंबा दिला होता. परिचारकरांच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात काळे आणि भालके सहभागी झाले नव्हते. काळे आणि भालके यांनी शांत राहून परिचारक गटाला पाठिंबा दर्शविण्यासाठी योग्य ठिकाणी संदेश पोचविण्यात आले होते. बाजार समितीतील पाठिंब्याची परतफेड परिचारक गटाने केली आहे.
कल्याणराव काळे प्रचारासाठी फिरत असताना त्यांच्या बैठकीला परिचाक गटाचे कार्यकर्ते उपस्थिती लावताना दिसून येत आहेत. ‘तुम्ही आम्हाला बाजार समितीत मदत केली, आम्ही तुम्हाला कारखान्याच्या निवडणुकीत मदत करणार, असे परिचारक गटातील नेते सांगत आहेत. त्यामुळे परिचारकांनी मदतीची परतफेड केली. मात्र, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भूमिकेकडे पंढरपूरचे लक्ष लागले आहे.
मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे हे ठामपणे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या पाठीशी उभे राहिले होते. महाडिकांच्या प्रचार सभांमध्ये सक्रीय हजेरील लावली होती. आता काळेंच्या कारखान्याची निवडणूक लागली आहे, त्यामुळे महाडिक हे काळेंच्या पाठीशी उभे राहणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरकीडे भीमाच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनीही महाडिकांना मदत केली होती, त्यामुळे महाडिक आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.