NCP : मागील महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने खरीप पिकासंह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी. तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ( NCP ) निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार नीलेश लंके, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, संजय कोळगे, वसंत कांबळे, काकासाहेब तापकीर, किसनराव लोटके, प्रा. सीताराम काकडे, प्रकाश पोटे, अमित खामकर, शारदा लगड आदी उपस्थित होते.
अँड्रॉईड मोबाईल नाहीत
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी सक्तीची करू नये. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे अद्यापही अँड्रॉईड मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी व डोंगरऱ्यामध्ये मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करावेत व त्याना लवकरात लवकर अनुदान द्यावेत, अशी मागणी चंद्रशेखर घुले पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.
- प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री
जिल्ह्यात काल (सोमवारी) जोरदार पाऊस झाला. १३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीचा मॉन्सून लांबल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, बाजरी, पालेभाज्या, फळभाज्या, मका, कांदा, कडधान्य आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काल (सोमवारी) सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदे, पाथर्डी, अकोले तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.
नद्यांना पूर
पावसाळा लांबल्याने आधीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडल्याने नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. मागील एका महिन्यापासून हीच स्थिती जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांची आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टी झालेली मंडळे
( संख्या मिलीमीटरमध्ये )
काष्टी - ६९.३
पेडगाव -६७.५
चिंभळे - ८६
देवदैठण - ७४
शेवगाव - ९६.८
बोधेगाव - ६६.५
चापडगाव (ता. शेवगाव) - ६६.३
पाथर्डी - ९२
करंजी - ६७
मिरी - ७१
साकीरवाडी - ६६.३
राजूर - ६६.३
ब्राह्मणवाडा - ६५.८
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.