Solapur Election: सोलापुरातील चार मतदारसंघात दुरंगी लढत; बबनदादांची मुलासाठी माघार, सांगोल्याच्या देशमुखांचे बंड

Solapur Political News : अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. या शिवाय माळशिरसमध्ये उत्तम जानकर आणि विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात, तर बार्शीत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शड्डू ठोकला आहे.
Solapur Assembly Election 2024
Solapur Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचे चित्र सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर) माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात दुरंगी, पाच मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सात मतदारसंघात विशेष घडामोडी घडल्यामुळे विशेष चर्चेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात 334 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्या पैकी आज 150 उमेदवारांनी माघार घेतल्याने 184 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, माळशिरस आणि बार्शी मतदारसंघात दुरंगी, तर करमाळा, माढा, सांगोला, सोलापूर शहर मध्य, मोहोळ या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. पंढरपुरात चौरंगी आणि दक्षिण सोलापूरमध्ये पंचरंगी लढत होत आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घ्यावी लागली. मात्र, धर्मराज काडादी यांनी अर्ज कायम ठेवल्याने सोलापूर दक्षिण मतदार संघात विशेष रंगत निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून अमर पाटील, महायुतीकडून (Mahayuti) माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काडादी यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, याकडे सोलापूरचे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

दक्षिण सोलापूरनंतर पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ट्विस्ट निर्माण झाला आहे. शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मनसेनेही दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून निष्ठावंताला संधी दिली आहे.

सोलापूर शहर उत्तरमधून भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचे आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीचे माजी महापौर महेश कोठे यांचे तगडे आव्हान यावेळी देशमुखांच्या समोर असणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माघार घेतल्याने देशमुख यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Solapur Assembly Election 2024
Solapur Politic's : सोलापुरातील 11 मतदारसंघात 184 उमेदवार रिंगणात; सर्वाधिक दक्षिणेत, तर मोहोळमध्ये सर्वांत कमी उमेदवार!

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र कोठेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे मनीष काळजे यांनी माघार घेत कोठे यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक तौफिक शेख हे आले होते. मात्र, त्यांना निवडणूक कार्यालयात पोहोचायला तीन मिनिटे उशीर झाला, त्यामुळे तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज सोलापूर शहर मध्य मतदार संघात कायम राहिला आहे, त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो.

मोहोळ मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम आणि त्यांची कन्या सिद्धी कदम यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजू खरे, तर महायुतीकडून विद्यमान आमदार यशवंत माने हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. याशिवाय संजय क्षीरसागर हे प्रबळ अपक्ष ही निवडणूक लढवत आहेत.

माढ्यातून विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी माघार घेत मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत असून महायुतीकडून माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे, तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे निवडणूक लढवीत आहेत.

सांगोला मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे, तर महायुतीकडून आमदार शहाजी पाटील हे नशीब आजमावत आहेत. महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाला सांगोला मतदारसंघ सुटला नाही. मात्र, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

करमाळा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून विद्यमान आमदार संजय शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष नशीब आजमावत आहेत, त्यांच्यापुढे महायुतीकडून शिवसेनेचे दिग्विजय बागल तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान असणार आहे.

Solapur Assembly Election 2024
Solapur South : दक्षिणेतील नाट्यमय घडामोडीत काँग्रेस घायाळ; काडादींचा नकार, मानेंना घ्यावी लागली माघार...

अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. या शिवाय माळशिरसमध्ये उत्तम जानकर आणि विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात, तर बार्शीत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शड्डू ठोकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com