Manoj Ghorpade: आपल्याला पंधराशे रुपये मिळत असल्याने तुतारीवाल्यांना पोटाचे त्रास सुरू झाले. एक जण तर न्यायालयात गेले. योजना बंद करण्याची मागणी केली. मात्र, आमच्या तीन भावांनी लाडक्या बहिणींच्या पैशांची तरतूद अगोदरच करून ठेवली आहे. म्हणून आता आपली लढाई चोरांविरोधात आहे.
२५ वर्षे उत्तर कऱ्हाडला आमदार, मंत्री राहूनही कामे केली नाहीत. लोकांची ही मजबुरी होती. लोकांकडे पर्याय नव्हता; पण आता मनोज घोरपडेच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध झाला आहे. मनोज घोरपडे आपला सख्खा भाऊ आहे त्यांना निवडून आणा, असे आवाहन आमदार चित्रा वाघ यांनी केले.
उंब्रज (ता. कऱ्हाड) येथे मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, समता घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, दीपाली खोत, सीमाताई घार्गे, अंजली जाधव, मीनाक्षी पोळ, उंब्रजच्या उपसरपंच सुनंदा जाधव, प्रतिभा कांबळे, वैशाली मांढरे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
आमदार वाघ म्हणाल्या, की लाडकी बहीण योजना आल्यावर तुतारीवाल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. मात्र, तीन भावांनी बहिणींच्या खात्यात पैसे देण्याची तरतूद आधीच केली आहे.
याच सुळे यांनी दहा एकरांत १०० कोटींची वांगी लावली. आज तुतारीवाली ताई सांगते, आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार; पण बहुतेक या दहा एकरांतील वांग्यातूनच देणार, अशी टीका त्यांनी केली.
बारामतीची ताई कुठले बियाणे वापरते, ज्या बियाणाने दहा एकरांत १०० कोटी वांगी पिकतात. ते बियाणे तरी पाठवा, असा टोलाही वाघ यांनी लगावला. तुतारीचे गृहमंत्री जेलमध्ये गेले ही राज्याची नामुष्की असल्याचेही त्यांनी सांगितले.
चित्रलेखा माने- कदम म्हणाल्या, की कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेकदा तिरंगी लढती झाल्या. त्यामुळे परिवर्तन होऊ शकले नाही; परंतु या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर दुरंगी लढत होत असून, मनोज घोरपडे यांना जो पाठिंबा मिळत आहे, तो पाहता विजयाचा गुलाल आपलाच आहे. यावेळी तेजस्विनी घोरपडे व अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.