Namedav Shastri : परळीतील भस्मासुराचा जन्मदाता कोण? त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावलं?; मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या नामदेवशास्त्रींना महाजनांचे परखड सवाल

Prakash Mahajan Questioned Namedav Shastri : ज्या ज्ञानेश्वरीमुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली, त्या संत ज्ञानेश्वरांचं आपली बहीण मुक्ताईसोबत काय वागणं होतं, हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असतं, तर तुम्ही पंकजाला नाकारलं नसतं. या दुहेरी मापदंडाचे आपल्याकडे काय उत्तर आहे.
Prakash Mahajan-Dhananjay Munde- Namedav Shastri
Prakash Mahajan-Dhananjay Munde- Namedav Shastri Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी सध्या चोहोबाजूंनी टीकचे धनी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठीशी भगवान गड उभा राहील, असा शब्दही दिला आहे. नामदेव शास्त्री यांच्या त्या विधानावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी महंतांना ‘परळीतील भस्मासुराचा जन्मदाता कोण? त्याला पोसलं आणि वाढवलं कोणी? त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावलं? हे अपत्य कोणाचं?, त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल केले आहेत. तसेच, नामदेवशास्त्रींनी आता आता टीका आणि स्तुती या दोन्हीची तयारी ठेवावी, असा सल्लाही दिला आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, नामदेव शास्त्री (Namedav Shastri) यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे. ते स्वतःला न्यायाचार्य पदवी लावतात, त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन करावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यनिमित्ताने ते राजकारणात आले आहेत, त्यामुळे काही वेळा स्तुती आणि काही वेळा टीका होईल, या दोन्हीची तयारी त्यांनी आता ठेवली पाहिजे. त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पंकजा मुंडेंना गडावरून राजकारण करायचं नाही; म्हणून 2015 ला गडावर (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली. आज 10 वर्षांनंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारण्यांसाठी उघडे झाले. पंकजा मुंडेंना 2015 ला दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी मेळावा घेतला आणि ती परंपरा चालू राहिली, या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे, असेही प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी स्पष्ट केले.

Prakash Mahajan-Dhananjay Munde- Namedav Shastri
Solapur Politic's : नवख्या राजू खरेंनी दोन 'मालकां'ना एकाच वेळी शिंगावर घेतले...

ज्या भगवान गडाने पंकजा मुंडेंना एकटं सोडलं, त्याच भगवानबाबांच्या लाखो शिष्यांनी पंकजा मुंडेंना तळहातावर उचलून घेतलं. कारण भगवानबाबांचा खरा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. आज महंत आवाहन करतायत, त्यात काही वावगं नाही. त्यांनी करावं. मात्र, पंकजा मुंडे ह्या केवळ महिला आणि आबला होत्या म्हणून तुम्ही त्यांना न्याय नाकारला का..? मेळावा घेण्याचा अधिकार नाकारला का..? तुम्ही न्यायाचार्य आहात, तर तुमच्यासमोर न्याय करताना हा भेदभाव का आहे, असाही सवाल प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्री यांना विचारला आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, ज्या ज्ञानेश्वरीमुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली, त्या संत ज्ञानेश्वरांचं आपली बहीण मुक्ताईसोबत काय वागणं होतं, हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असतं, तर तुम्ही पंकजाला नाकारलं नसतं. या दुहेरी मापदंडाचे आपल्याकडे काय उत्तर आहे. असं काय मोठं दिव्य केलं की, धनंजय मुंडे हे निष्पाप आणि निरापराध आहेत, असं सर्टिफिकेट तुम्ही त्यांना दिलं?

Prakash Mahajan-Dhananjay Munde- Namedav Shastri
Khadse Vs Mahajan : खडसे-महाजन वादापुढे केंद्रीय मंत्र्यानेही टेकले हात; दिलजमाईसाठीची शिष्टाई ठरली अयशस्वी!

मी धनंजय मुंडेंच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात साधूसंत राजकारणात आले तर त्यानिमित्ताने चांगली माणसं येतील आणि वाईट माणसं दूर होतील. नायतर कसा भस्मासूर परळीत झाला आणि त्याने कसा बीड जिल्हा खाल्ला, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का..? त्याला पोसलं आणि वाढवलं कोणी..? त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावलं..? हे अपत्य कोणाचं आहे, याची जबाबदारी कोण घेणार? याची उत्तरं महंत देणार आहेत का..? सत्तेच्या सिंहासनावर साधूत्व जरी आरूढ झालं, तरी पिसं गळतात ती साधुत्वाची.. आता त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे, लगेच पिसं गळतील, असा टोलाही महाजन यांनी नामदेव शास्त्रींना लगावला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com